मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत…
Mhada house Lottery Mumbai: सर्वसामान्य नागरिकांना मुंबईसारख्या शहरात मोक्याच्या ठिकाणी स्वस्त दरात स्वत:चे हक्काचे घर विकत घेण्याची सुवर्णसंधी प्राप्त करुन देणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (Mhada) अर्थात म्हाडाच्या मुंबईतील (Mumbai news) 2640 घरांच्या सोडतीची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या घरांसाठी अर्ज भरलेले नागरिक आतुरतेने घरांची लॉटरी (Mhada Lottery) कधी जाहीर होणार याची वाट पाहत होते. त्यांची ही प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. कारण, म्हाडाकडून येत्या 6 तारखेला दुपारी 12 वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात 2640 घरांची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता असल्याने म्हाडाच्या घरांची लॉटरी लांबवणीवर पडली होती. मात्र, अखेर याला मुहूर्त मिळाल्याने या घरांसाठी अर्ज भरलेल्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. (Mumbai affordable house news)
म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी तब्बल 75 हजांराहून अधिक नागरिकांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे एका घरासाठी सरासरी 28 ते 29 जण शर्यतीत आहेत. यापैकी कोणाचे नशीब फळफळणार, हे आता पाहावे लागेल. रंगशारदा सभागृहात घरांची सोडत जाहीर झाल्यानंतर नागरिकांना हा निकाल ऑनलाईनही पाहता येईल. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबद्दलचा तपशील जाहीर केला जाईल. यंदा मुंबईतील म्हाडाच्या घरांची वाढलेली किंमत प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. या सगळ्यानंतर विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथील 1221 घरांची किंमत म्हाडाने 7.5 टक्क्याने कमी केली होती. तरीही ही घरे सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची चर्चा होती. याशिवाय, म्हाडाने घरांसाठी अर्ज भरताना अनामत रक्कमेची मर्यादाही मोठ्याप्रमाणावर वाढवली होती. काही घरांसाठी 1 लाख रुपये इतकी अनामत रक्कम घेण्यात आली आहे. या माध्यमातून म्हाडाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची आवक झाली होती. मात्र, सोडत लांबवणीर पडल्याने नागरिकांचे हे पैसे अडकून पडले होते.
Mumbai Real estate: म्हाडाची घरं मुंबईतील कोणत्या भागात?
म्हाडाच्या मुंबई मंडळाने कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागा ठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा-पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांसाठी 2640 सदनिकांचा या लॉटरीमध्ये समावेश आहे. त्यापैकी अत्यल्प उत्पन्न गटासाठी 145 घरं, अल्प उत्पन्न गटासाठी 858 घरं, मध्यम उत्पन्न गटासाठी 798 घरं आणि उच्च उत्पन्न गटासाठी 839 घरं उपलब्ध करून देण्यात आली होती.
Comments are closed.