नॉन-स्टिक ते प्लास्टिक…स्वयंपाकघरातील भांड्याचे आयुष्य किती?
आपल्या स्वयंपाकघरात वर्षानुवर्षे वापरली जाणारी भांडी दिसायला जरी चांगली असली, तरी ती आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानानुसार ठराविक काळानंतर जुनी भांडी अन्नामध्ये हानिकारक रसायने आणि धातू सोडू लागतात, ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. म्हणूनच, कोणत्या भांड्याचे आयुष्य किती असते, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
नॉन-स्टिक भांडी (आयुष्य – 2 ते 3 वर्षे)
नॉन-स्टिक भांड्यांवर टेफ्लॉनचे आवरण असते. काही वर्ष सतत वापरल्याने किंवा जोरात घासल्याने हे आवरण निघते. हे आवरण निघाल्यावर जेव्हा हे भांडं वापरलं जातं तेव्हा कर्करोगजन्य वायू आणि रसायने बाहेर पडतात, जी थेट अन्नात मिसळतात. त्यामुळे जर तुमच्या नॉन-स्टिक भांड्यांवर ओरखडे आले असतील तर ती ताबडतोब बदलावीत.
ॲल्युमिनियमची भांडी (आयुष्य – 3 ते 5 वर्षे)
ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये सतत आंबट किंवा आम्लयुक्त पदार्थ शिजवल्यास ती हळूहळू झिजतात. जर भांड्याचा तळ पातळ झाला असेल किंवा त्याला छिद्रे पडू लागली असतील तर ती वापरणे बंद करा. अन्नातून शरीरात जाणारे जास्त ॲल्युमिनियम मेंदू आणि हाडांच्या आरोग्यासाठी हानिकारक असते.
प्लास्टिक भांडी (आयुष्य – 6 महिने ते 1 वर्ष)
स्वयंपाकघरात प्लास्टिकचे डबे सर्रास वापरले जातात. मात्र, मायक्रोवेव्ह किंवा गरम अन्न ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक भांड्यांचे आयुष्य जास्तीत जास्त 1 वर्ष असते. जुन्या प्लास्टिकमधून बायस्फेनॉल-एसारखी विषारी रसायने बाहेर पडतात, जी हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात.
तांब्याची आणि पितळेची भांडी (लेप नसलेली: असुरक्षित)
तांब्याच्या आणि पितळेच्या भांड्यांचे आयुष्य जास्त असते, परंतु त्यांची खरी मुदत त्यांच्यावरील लेपवर अवलंबून असते. लेप नसलेल्या पितळेच्या किंवा तांब्याच्या भांड्यांमध्ये आंबट, खारट किंवा दुग्धजन्य पदार्थ ठेवल्यास धातूची अन्नासोबत रासायनिक अभिक्रिया होऊन अन्नातून विषबाधा होऊ शकते. जर या भांड्यांवरील लेप निघून गेला असेल किंवा त्यावर हिरवट-काळसर डाग दिसू लागले असतील तर त्यांचा वापर तात्काळ थांबवा.
लाकडी स्पॅटुला आणि चॉपिंग बोर्ड (आयुष्य -1 वर्ष)
सततच्या ओलाव्यामुळे लाकडी स्पॅटुला आणि चॉपिंग बोर्डला बारीक भेगा पडतात. या भेगांमध्ये अन्न अडकते आणि ई. कोलाय आणि साल्मोनेला वाढू लागतात, जे सामान्य साबणाने स्वच्छ करता येत नाहीत. त्यामुळे ते दरवर्षी बदलले पाहिजेत.
हेही वाचा – DMart मध्ये शॉपिंग? या सीक्रेट ट्रिक्सने वाचतील हजारो रुपये
Comments are closed.