Messy Room : अस्ताव्यस्त घर सांगतं तुमचा मानसिक तणाव

अनेकदा एखाद्याचं घर किंवा खोली अस्ताव्यस्त दिसली की आपण लगेच त्याला “आळशी” असा शिक्का मारतो. पण प्रत्येक वेळी वास्तव तसंच असतं का? तज्ज्ञांच्या मते, काही वेळा बिखरलेली खोली ही केवळ सवय किंवा आळशीपणाचं लक्षण नसून मानसिक तणाव, भावनिक थकवा किंवा इतर मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचं संकेत असू शकते.

प्रत्येक पसाऱ्यामागे आळशीपणा नसतो
कामाचा ताण, अभ्यास, आर्थिक चिंता, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा नातेसंबंधातील तणाव यामुळे अनेक जण मानसिकदृष्ट्या इतके थकून जातात की घर आवरण्यासारख्या दैनंदिन कामांसाठी त्यांच्याकडे ऊर्जा उरत नाही. घर आवरायची इच्छा असते, पण ती कृतीत आणणं कठीण वाटू लागतं. दीर्घकाळ तणावाखाली राहिल्यास व्यक्तीचं लक्ष महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांकडे केंद्रित राहतं. अशावेळी घरातील स्वच्छता, वस्तू जागेवर ठेवणे किंवा खोली नीटनेटकी ठेवणे यांसारखी कामं सतत पुढे ढकलली जातात.

नैराश्यामुळे अवघड वाटतं
नैराश्य असलेल्या व्यक्तींना बिछान्यातून उठणं, जेवण बनवणं किंवा खोली आवरणं यांसारखी साधी कामंसुद्धा मोठं आव्हान वाटू शकतात. याचा अर्थ त्यांना स्वच्छता आवडत नाही असा नसून, त्यांच्याकडे मानसिक आणि शारीरिक ऊर्जा कमी झालेली असते.

ADHD असलेल्या व्यक्तींनाही अडचण
ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) असलेल्या व्यक्तींना कामाची सुरुवात कुठून करावी, कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावं आणि काम पूर्ण कसं करावं, याचं नियोजन करणं कठीण जाऊ शकतं. त्यामुळे खोली आवरण्याचा विचार असूनही काम पूर्ण होत नाही. सतत चिंता करणाऱ्या व्यक्तींना अगदी लहान निर्णय घेणंसुद्धा अवघड वाटू शकतं. “पहिल्यांदा काय आवरू?”, “कुठून सुरुवात करू?” अशा विचारांमध्येच वेळ जातो आणि पसारा तसाच राहतो.

जर घर आवरण्यातील अडचण काही दिवसांपुरती मर्यादित न राहता दीर्घकाळ सुरू असेल आणि त्यासोबत सतत उदासी, थकवा, झोपेचा त्रास, चिंता किंवा रोजच्या कामांमध्ये रस कमी होणं अशी लक्षणं दिसत असतील, तर मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकांचा सल्ला घेणं योग्य ठरू शकतं.

Comments are closed.