Love Psychology : प्रेमात लूक्स किती महत्त्वाचे? संशोधनातून समोर आलं उत्तर
“प्रेम आंधळं असतं” असं आपण अनेकदा ऐकतो. पण खरंच प्रेमाची सुरुवात फक्त मनापासून होते का? की पहिल्यांदा नजरेत भरतो तो चेहरा, व्यक्तिमत्त्व आणि वागण्याची शैली? खरं तर एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटताना आपण त्याचा स्वभाव ओळखू शकत नाही. त्याआधी आपलं लक्ष वेधून घेतं ते त्याचं व्यक्तिमत्त्व, चेहऱ्यावरील भाव, स्मितहास्य, आत्मविश्वास आणि स्वतःला सादर करण्याची पद्धत. त्यामुळे सुरुवातीच्या आकर्षणात बाह्य व्यक्तिमत्त्वाची भूमिका नक्कीच असते. मात्र, नातं टिकवण्यासाठी केवळ चांगला लूक पुरेसा नसतो. love psychology facts
पहिल्या भेटीत काय होतं?
मानसशास्त्राशी संबंधित अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की, पहिल्या भेटीत एखाद्या व्यक्तीचा चेहरा, देहबोली आणि संवादाची शैली समोरच्यावर पहिली छाप पाडतात. 2009 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, अनोळखी व्यक्तीशी पहिल्या भेटीत शारीरिक आकर्षण आणि चेहऱ्यावरील भाव हे संवादाची सुरुवात होण्यामागील महत्त्वाचे घटक ठरू शकतात.
‘लूक्स’ म्हणजे म्हणजे काय?
लूक्समध्ये सुंदर दिसणं, गोरा रंग किंवा मॉडेलसारखी ठेवण नव्हे. प्रत्येक व्यक्तीसाठी आकर्षणाची व्याख्या वेगळी असते. काहींना साधेपणा आवडतो, काहींना आत्मविश्वास, तर काहींना हसतमुख स्वभाव आकर्षित करतो. एखाद्याची बोलण्याची पद्धत, डोळ्यांतील आत्मीयता किंवा स्वतःला कॅरी करण्याची शैलीही तितकीच प्रभावी ठरू शकते.
…तर प्रेम नातं टिकवतं
पहिलं आकर्षण अनेकदा संवादाची दारं उघडतं. त्यामुळे दोन व्यक्ती एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळते. पण त्यानंतर नातं पुढे न्यायचं असेल, तर विश्वास, आदर, समजूतदारपणा आणि भावनिक जुळवून घेण्याची क्षमता अधिक महत्त्वाची ठरते. फक्त बाह्य सौंदर्यावर उभं राहिलेलं नातं फार काळ टिकत नाही. नात्याची खरी ताकद एकमेकांच्या स्वभावात आणि परस्परांच्या साथीत असते.
प्रेम वाढलं की सौंदर्याची व्याख्या बदलते
मानसशास्त्रज्ञांच्या मते, दोन व्यक्तींमध्ये भावनिक नातं घट्ट होत गेलं की, त्यांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. सुरुवातीला जाणवणाऱ्या छोट्या-छोट्या उणिवाही नंतर आपल्याला आवडू लागतात. म्हणूनच अनेकदा दीर्घकाळ टिकलेल्या नात्यांमध्ये “तू जसा आहेस तसाच आवडतोस” ही भावना निर्माण होते.
म्हणूनच आकर्षण आणि प्रेम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आकर्षण नात्याची सुरुवात करू शकतं, पण प्रेमाची खरी ओळख काळानुसार निर्माण होणाऱ्या विश्वासात आणि भावनिक नात्यातच दडलेली असते.
Comments are closed.