तणावामुळे वारंवार भूक लागते? ‘स्ट्रेस ईटिंग’ची लक्षणं, कारणं आणि उपाय
दिवसभराचा कामाचा ताण, आर्थिक चिंता, नातेसंबंधांतील समस्या किंवा वैयक्तिक अडचणी यामुळे मानसिक तणाव वाढणे ही आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीतील सामान्य बाब झाली आहे. मात्र, या तणावाचा परिणाम केवळ मनावरच नाही तर आपल्या खाण्याच्या सवयींवरही होतो. काही लोक तणावात असताना अन्नाकडे पाठ फिरवतात, तर काहींना वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा होते. विशेषतः चॉकलेट, आईस्क्रीम, पिझ्झा, बर्गर किंवा इतर जंक फूड खाल्ल्यानंतर काही काळ बरं वाटतं. पण ही सवय सतत होत असेल, तर ती ‘स्ट्रेस ईटिंग’चं लक्षण असू शकते. stress eating symptoms
स्ट्रेस ईटिंग म्हणजे नेमकं काय?
स्ट्रेस ईटिंग म्हणजे शरीराला प्रत्यक्ष भूक नसतानाही मानसिक तणाव, चिंता, नैराश्य किंवा भावनिक अस्वस्थता कमी करण्यासाठी वारंवार खाणे. अशावेळी व्यक्ती भूक भागवण्यासाठी नाही, तर मनाला तात्पुरता दिलासा मिळावा म्हणून अन्नाचा आधार घेते. कालांतराने ही सवय व्यसनासारखी होऊ शकते.
ही लक्षणं दिसत असतील तर सावध व्हा!
तणाव वाढला की लगेच काहीतरी खाण्याची इच्छा होणे.
गोड, तळलेले, चॉकलेट किंवा जंक फूडची तीव्र क्रेव्हिंग होणे.
पोट भरलेलं असतानाही खाणं सुरू ठेवणं.
खाल्ल्यानंतर अपराधीपणा किंवा पश्चात्ताप वाटणे.
प्रत्येक भावनिक प्रसंगी अन्नाकडेच आधार म्हणून पाहणे.
तणावात भूक का वाढते?
तणावाच्या काळात शरीरात कॉर्टिसोल (Cortisol) या हार्मोनची पातळी वाढू शकते. हा हार्मोन शरीराला अधिक ऊर्जा मिळावी म्हणून जास्त कॅलरी असलेल्या पदार्थांची इच्छा निर्माण करू शकतो. त्यामुळे गोड आणि फॅटयुक्त पदार्थ खाल्ल्यावर काही काळ मूड सुधारल्यासारखा वाटतो. मात्र, हा परिणाम तात्पुरता असतो आणि नंतर पुन्हा तणाव जाणवू शकतो.
यामुळे कोणते धोके वाढू शकतात.
स्ट्रेस ईटिंगकडे दुर्लक्ष केल्यास अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. जसे की वजन झपाट्याने वाढणे, लठ्ठपणाचा धोका, टाइप-2 मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे, हृदयविकारांचा धोका, मानसिक तणाव आणि चिंता आणखी वाढणे
कधीकधी तणावामुळे जास्त खाणं ही नैसर्गिक प्रतिक्रिया असू शकते. मात्र, ही सवय रोजची होत असेल आणि त्यामुळे वजन, आरोग्य किंवा मानसिक स्थितीवर परिणाम होत असेल, तर त्याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. योग्य वेळी जीवनशैलीत बदल केल्यास ‘स्ट्रेस ईटिंग’वर नियंत्रण मिळवणं शक्य आहे.
Comments are closed.