Cleaning Hacks: सकाळी घरातून निघण्याआधी 5 मिनिटांत घर आवरण्याच्या ट्रिक्स
सकाळची वेळ म्हणजे अक्षरशः धावपळ. उठल्यापासून चहा, नाश्ता, मुलांची तयारी, ऑफिसची घाई आणि घरातून वेळेत बाहेर पडण्याची लगबग. या सगळ्यात घर आवरायचं राहून जातं आणि बाहेर पडताना घरभर पसारा दिसला की दिवसभर मनात एकच विचार सुरू राहतो, संध्याकाळी आल्यावर हे सगळं आवरायचं कसं? पण सकाळी फक्त 5 मिनिटं योग्य पद्धतीने वापरली, तर घर पूर्णपणे नाही पण बरंचसं नीटनेटके नक्की करता येत येतं.
पहिलं मिनिट: उठल्यानंतर सर्वात आधी बेडशीट आणि उशा व्यवस्थित करा. बेड नीट दिसला की खोलीचा संपूर्ण लूक लगेच बदलतो.
दुसरं मिनिट: टेबल, सोफा किंवा हॉलमध्ये पडलेल्या वस्तू पटकन त्यांच्या जागेवर ठेवा. प्रत्येक वस्तू व्यवस्थित लावण्याऐवजी आधी पसारा कमी करण्यावर लक्ष द्या.
तिसरं मिनिट: सिंक किंवा प्लॅटफॉर्मवर भांडी पडली असतील तर ती एका बाजूला व्यवस्थित ठेवा. गॅस आणि किचन प्लॅटफॉर्मवरचा उघड दिसणारा पसारा पटकन साफ करा.
चौथं मिनिट: घरातील कचरापेटी भरली असेल तर कचरा बाहेर काढून नवीन पिशवी लावा. यामुळे घरातून बाहेर पडताना स्वच्छतेची भावना राहते.
पाचवं मिनिट: शेवटच्या मिनिटात घरात पटकन नजर फिरवा. सोफ्यावरचे कपडे, जमिनीवरच्या वस्तू उचला किंवा उघडे राहिलेले दरवाजे बंद करा.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळच्या या पाच मिनिटांत खोलवर साफसफाई करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त दिसणारा पसारा कमी करा. रोज ही छोटी सवय लावली तर घर आवरण्याचा ताणही कमी होईल आणि संध्याकाळी घरी परतल्यावर घराचा नीटनेटका लूक पाहून चिडचिड होणार नाही शांतता मिळेल.
Comments are closed.