सणांमुळे बजेट कोलमडलं? असं करा फायनान्शिअल डिटॉक्स

गौरी-गणपतीचा सण नुकताच झाला. बाप्पाच्या स्वागतासाठी केलेली सजावट, नवीन कपडे, मिठाई आणि पाहुण्यांची सरबराई यामुळे बजेटपेक्षा थोडा जास्तच खर्च झाला असेल. आता लवकरच दिवाळी सण येणार आहे. त्यामुळे या दोन मोठ्या सणांच्या मधला काळ म्हणजे खिशाला थोडा आराम देण्याची आणि पैशांचे फायनान्शिअल डिटॉक्स करण्याची संधी असते. तुम्ही काही छोटे बदल केल्यास नक्कीच उत्तम बचत करू शकता.

नो-शॉपिन आव्हान

पुढील 30 दिवसांसाठी अनावश्यक खरेदी पूर्णपणे थांबवा. कपडे, गॅजेट्स किंवा ऑनलाइन सेलच्या मोहात पडू नका. या एका महिन्यात फक्त गरजेच्या गोष्टींवरच खरेदी कराव्यात.  गणपतीत किती खर्च झाला आणि दिवाळीसाठी किती लागणार आहे, याचा स्पष्ट हिशोब कागदावर मांडावा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल.

बाहेरचे खाणे बंद

वीकेंडला हॉटेलमध्ये जाणे किंवा ऑनलाइन फूड मागवणे टाळा. घरातच जेवणाचे स्मार्ट प्लॅनिंग करा.

जुन्या वस्तूंचा पुनर्वापर

दिवाळीत घर सजावटीचा खर्च टाळण्यासाठी जुन्या वस्तूंचा वापर करावा. जुन्या साड्यांपासून कुशन कव्हर्स बनवणे किंवा मातीच्या जुन्या दिव्यांना रंग देऊन ते पुन्हा वापरल्यास पैसे वाचतील आणि घराला नवा लूकही मिळेल.

खर्चावर नियंत्रण

आपण वापरत नसलेले ओटीटी प्लॅटफॉर्म्स सबस्क्रिप्शन तात्पुरते रद्द करू शकता. रोजच्या प्रवासात कॅबऐवजी बस, लोकलचा वापर केल्यास इंधनावरील खर्चात मोठी बचत होईल.

खरेदी आधीच प्लॅन करा

दिवाळीच्या अगदी दोन दिवस आधी खरेदीला गेल्यास वस्तू महाग मिळतात. त्यामुळे आतापासूनच यादी तयार करावी. कपडे, फराळाचे सामान आणि भेटवस्तूंचे बजेट ठरवून टप्प्याटप्प्याने खरेदी करावी.

हेही वाचा – World Tourism Day: फक्त फिरण्यासाठी नाही, तर स्वतःला नव्याने अनुभवण्यासाठी करा पर्यटन

Comments are closed.