चेंगझी प्राचीन गाव: घरांच्या छतावर रस्त्यांसह एक विचित्र गाव
चीनच्या युनान प्रांतातील चेंग्झी प्राचीन गावाची रचना इतर गावांपेक्षा खूप वेगळी आहे. डोंगराच्या उतारावर वसलेल्या या गावातील पारंपरिक मातीची घरं एकमेकांना अगदी जवळून जोडलेली आहेत. त्यामुळे एका घराचं छत हे त्याच्या वरच्या स्तरावर असलेल्या घरासाठी चालण्याचा मार्ग किंवा मोकळी जागा बनतं.
गावातील अनेक घरांना सपाट छतं आहेत. ही छतं एकमेकांशी जोडली गेल्यामुळे काही भागांमध्ये खालील अरुंद रस्त्यांऐवजी छतांवरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा अनुभव मिळतो. म्हणूनच चेंग्झीला काही ठिकाणी ‘रोड्स ऑन रूफटॉप्स’ किंवा ‘एरियल व्हिलेज’ अशा स्वरूपात वर्णन केलं जातं.
या रचनेमागे केवळ वेगळेपणा नसून डोंगराळ भूभागाचा जास्तीत जास्त उपयोग, घरांची एकमेकांमध्ये गुंफलेली रचना आणि पारंपरिक संरक्षणात्मक गरजा यांचाही संबंध असल्याचं संशोधनातून दिसतं.
विशेष म्हणजे, ही केवळ पर्यटनासाठी तयार केलेली रचना नाही. गावाच्या पारंपरिक वास्तुरचनेतच छतं दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग राहिली आहेत. त्यामुळे जमिनीवर रस्ते आणि वर घरं या नेहमीच्या कल्पनेपेक्षा चेंग्झीमध्ये काही ठिकाणी चित्र अगदी उलट दिसतं घरांच्या छतांवरच चालण्याचे मार्ग आहेत.
Comments are closed.