Ratnagiri News – रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचा ५ ऑक्टोबरला मूक मोर्चा! मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी एल्गार
देशात सुरू असलेल्या “व्होट चोरी” प्रकरणावरून आणि निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात रत्नागिरी जिल्हा काँग्रेस आक्रमक झाली आहे. “ज्ञानेश कुमार हटावा, लोकशाही वाचवा!” असे आवाहन करत ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता रत्नागिरीत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या देशात “व्होट चोरी” चे कर्तेधर्ते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे अन्य दोन्ही निवडणूक आयुक्तांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने निर्णय घेत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. निवडणूक आयोगाची कार्यपद्धती म्हणजे लोकशाहीची आणि पर्यायाने संविधानाची हत्या असल्याचे नमूद करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत देशातील संविधान व लोकशाही रक्षणासाठी हा लढा असाच सुरू राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होईल. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश कीर आणि प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलिपे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संविधान प्रेमी जनतेला लोकशाहीच्या रक्षणासाठी या मूक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Comments are closed.