डिजिटल अरेस्ट प्रकरणातील फरार चौथा आरोपी अखेर जेरबंद,  लॉजमध्ये लपून बसलेल्या आरोपीला पहाटे बेड्या

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

यवतमाळ शहरातील ज्येष्ठ नागरिकांची तब्बल 32 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या डिजिटल अरेस्ट प्रकरणातील फरार चौथ्या आरोपीला अखेर यवतमाळ पोलिसांनी जेरबंद केले. मनोज कुमार राजवीर सिंग (37, रा. भुवापूर, गाजियाबाद, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयातून पोलिसांना हुलकावणी देत पसार झाल्यानंतर तो नागपुरात लॉजमध्ये लपून बसला होता. पोलिसांनी त्याचा माग काढत शनिवारी पहाटे साडेतीन वाजता त्याला ताब्यात घेतले.

या प्रकरणात शहर पोलिसांनी यापूर्वी उत्तर प्रदेशातील गाजियाबाद तसेच मणिपूर येथून तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान या आरोपींनी आणखी काही साथीदार असल्याची माहिती दिली. त्यातून मनोज कुमार राजवीर सिंग याचे नाव समोर आले. त्याला यवतमाळ येथे आणून चौकशी सुरू असतानाच त्याने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हुलकावणी देत पलायन केले. त्याचे पलायन सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाले.

नागपूरमध्ये पोलिसांचे जाळे; लॉजमध्ये लपला

आरोपी उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याने तो राज्याबाहेर पसार होण्याची शक्यता पोलिसांना होती. त्यामुळे यवतमाळ पोलिसांनी नागपूर रेल्वे स्थानकावर त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र पोलिसांची हालचाल लक्षात येताच आरोपीने रेल्वेने पुढे जाण्याऐवजी नागपुरातील एका लॉजमध्ये आश्रय घेतला. पोलिसांनी त्याच्या हालचालींचा माग घेत लॉजपर्यंत पोहोचत त्याला बेड्या ठोकल्या. सपोनि विकास पाटील, भरत राठोड, पवन तडसे आणि कुणाल पांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

चालत्या रेल्वेतूनही केली होती अटक

विशेष म्हणजे, याच पोलिस पथकाने यापूर्वी या प्रकरणातील याच आरोपीला मोठ्या शिताफीने चालत्या रेल्वेतून फिल्मी पद्धतीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर हा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन रुग्णालयातून पसार झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने विविध पथके सक्रिय केली आणि अखेर नागपुरातील लॉजमधून त्याला ताब्यात घेतले. डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना धमकावत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या या टोळीचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.

Comments are closed.