या गावाला महाराष्ट्रातील ‘भुताचं गाव’ म्हणून ओळख
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील गोंदेमाळ हे गाव एका अनोख्या पारंपरिक प्रथेमुळे चर्चेत आहे. गावात पूर्वीपासून अशी धारणा होती की ठरावीक काळात गावात भूत-पिशाच्चांचा वावर असतो. त्यामुळे दर तीन वर्षांनी ग्रामस्थ काही दिवसांसाठी गाव पूर्णपणे सोडून बाहेर मुक्काम करतात.
ही परंपरा ‘पळ’ म्हणून ओळखली जाते. गुढीपाडव्याच्या तिसऱ्या दिवशी ग्रामस्थ गुराढोरांसह गावाबाहेर जातात आणि शेजारच्या गावात मुक्काम करतात. या काळात घरांमध्ये चूल पेटवली जात नाही. दिवसा काही लोक कामासाठी गावात येतात, मात्र सूर्यास्तापूर्वी पुन्हा गावाच्या वेशीबाहेर जातात. काही दिवसांनंतर काळभैरवनाथाचा कौल घेतला जातो आणि त्यानंतर ग्रामस्थ पुन्हा गावात प्रवेश करतात.
मात्र, गावात प्रत्यक्ष भुतं असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. गावकऱ्यांच्या मते ही प्रथा पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा आहे. यामागे पूर्वी गावात वंशवाढ होत नसल्याची एक आख्यायिकाही सांगितली जाते. त्यामुळे ‘भुताचं गाव’ ही ओळख मुख्यतः स्थानिक श्रद्धा आणि जुन्या परंपरेशी संबंधित आहे, वैज्ञानिक तथ्य म्हणून नव्हे.
Comments are closed.