स्तनपान करणाऱ्या मातांनी आहारात कोणते पदार्थ घ्यावेत?

बाळाच्या जन्मानंतर आईच्या आयुष्यात अनेक बदल होतात. या दिवसात बाळाची काळजी घेतानाच आईने स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देणं गरजेचं असतं. विशेषतः स्तनपान करणाऱ्या महिलांना शरीराची पोषणाची गरज पूर्ण करण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणं  गरजेचं आहे. योग्य आहारामुळे आईचे आरोग्य टिकवण्यास आणि प्रसूतीनंतर शरीराची होणारी झीज भरून काढण्यास मदत होते. आज आपण स्तनपान करणाऱ्या मातांनी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा यासंदर्भातील टिप्स पाहूयात.

डाळी आणि कडधान्ये

मूग, मटकी, मसूर, हरभरासारख्या कडधान्यांमधून प्रोटिन मिळतात. शरीराची दुरूस्ती आणि स्नायूंचे आरोग्य टिकवण्यासाठी प्रोटिन गरजेची असतात. त्यामुळे रोजच्या जेवणात डाळी आणि कडधान्यांचा समावेश करावा.

हिरव्या पालेभाज्या आणि फळे

पालक, मेथी, शेपू यांसारख्या पालेभाज्या तसेच मोसंबी, संत्री, पेरू आणि इतर हंगामी फळांचा आहारात समावेश करावा. या आहारातून तुम्हाला व्हिटामिन्स, आयर्न आणि फायबर्स मिळतील.

दूध, दही आणि सुका मेवा

दूध, दही, पनीर यांसारख्या पदार्थांतून प्रोटिन आणि कॅल्शियम मिळते. बदाम, अक्रोड आणि इतर सुक्या मेव्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने आहारातील पोषणमूल्य वाढते.

पुरेसं पाणी

स्तनपान करताना तहान वाढू शकते. त्यामुळे दिवसभर नियमित पाणी प्यावे. तहान लागल्यावर पाणी पिणं आणि स्तनपानाच्या वेळी जवळ पाण्याची बाटली ठेवावी.

लक्षात ठेवा, कोणताही एक पदार्थ खाल्ल्याने दूध वाढतं असं नाही. संतुलित आहार, पुरेशी विश्रांती आणि बाळाला गरजेनुसार स्तनपान देणं महत्त्वाचं आहे.

टीप – प्रत्येक नवजात बाळाची आणि त्याच्या मातेच्या आरोग्याची स्थिती वेगळी असते. त्यामुळे आहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

हेही वाचा – ऑफिसमध्ये सतत एसीमध्ये बसता? मग हे परिणाम नक्की जाणून घ्या

Comments are closed.