सतत नोटिफिकेशन्स चेक करण्याची सवय?




फोन स्क्रोलिंग


सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सतत फोन स्क्रोल करत असतो. काही सेकंदांनंतर फोनचे नोटिफिकेशन चेक करणे किंवा कोणताही कॉल किंवा मेसेज मिस झाला नाही ना, हे पाहण्यासाठी वारंवार फोन अनलॉक करणे आपल्याला अगदी सामान्य वाटते. पण ही फक्त एक साधी सवय आहे की मानसिक आरोग्याशी जोडलेली कोणतीही समस्या? याबाबत तज्ज्ञांच मत काय आहे हे जाणून घेऊयात.

सवय की एंग्जायटीचा संकेत?

तज्ज्ञांच्या मते, वारंवार मोबाईलवरील नोटिफिकेशन तपासणे ही सुरुवातीला सामान्य सवय वाटू शकते. मात्र, काही वेळा ही सवय मानसिक तणाव किंवा चिंतेचे लक्षण असू शकते. मोबाईलवर प्रत्येक वेळी नवीन नोटिफिकेशन आल्यावर आपल्याला काहीतरी नवीन कळल्याचा आनंद मिळतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा फोन तपासण्याची इच्छा होते. जर फोन जवळ नसताना किंवा नोटिफिकेशन पाहता न आल्यास अस्वस्थ वाटत असेल, घाबरल्यासारखे होत असेल, तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशा वेळी ही केवळ सवय नसून चिंतेशी संबंधित समस्या असू शकते.

तुम्ही तुमचा फोन वारंवार का तपासता?

  • कोणतीही महत्त्वाची माहिती किंवा अपडेट आपल्याकडून सुटून तर गेली नाही ना, ही भीती मनात असते.
  • कोणतीही वाईट बातमी किंवा कोणाला निराश तर केले नाही ना, या विचारांमुळे सतत फोन बघण्याची सवय जडते.

या सवयीचा नकारात्मक परिणाम आपल्या एकाग्रतेवर, झोपेवर आणि वैयक्तिक आयुष्यावर होऊ शकतो. मात्र, याचा अर्थ प्रत्येक वेळी असा होत नाही की व्यक्तीला एंग्जायटी डिसऑर्डर आहे; कामाचा ताण, सोशल मीडियाचे व्यसन किंवा कंटाळवाणी रुटीन यामुळेही असे घडू शकते.

ही सवय कशी बदलावी?

  • फोनमधील सर्व अनावश्यक ॲप्सचे नोटिफिकेशन बंद करून ठेवा.
  • जेवताना किंवा झोपण्यापूर्वी फोन स्वतःपासून दूर ठेवा.
  • दिवसभरात मेसेज किंवा सोशल मीडिया चेक करण्यासाठी ठराविक वेळ निश्चित करा.
  • स्क्रीन टाईम कमी करून नियमितपणे विश्रांती घ्या.
  • दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम करा.

हेही वाचा – दिवसभर ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत



Comments are closed.