सणांच्या दिवशी टेन्शन फ्री राहण्यासाठी आधीच करा असे नियोजन





दिवाळीत फराळ बनवणे, घराची साफसफाई, खरेदी आणि नातेवाईकांना भेटणे यांसारख्या अनेक गोष्टी आल्या. नोकरी करणाऱ्या महिला असोत किंवा गृहिणी सणाच्या दिवशी कामामुळे त्यांची प्रचंड तारांबळ उडते आणि यामुळे बऱ्याचदा सणाचा आनंद घेण्याऐवजी थकवाच जास्त जाणवतो. जर तुम्हालाही सणासुदीच्या काळात धावपळ आणि ताणतणाव टाळायचा असेल तर काही सोप्या गोष्टींचे आधीच नियोजन करून ठेवणे फायदेशीर ठरेल. जाणून घेऊया सणाच्या दिवशी कामाचे टेन्शन न घेता येणारे काही स्मार्ट टाईम मॅनेजमेंट हॅक्स

जेवणाची तयारी
सणाच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी स्वयंपाकघरात तासनतास उभे राहणे टाळण्यासाठी आधीच तयारी करावी. यामध्ये कडधान्ये आणि डाळी भिजवणे या गोष्टी आल्या. मुगाची उसळ, मटकी किंवा इतर कडधान्ये आदल्या रात्रीच भिजवून ठेवावीत, जेणेकरून सकाळी झटपट स्वयंपाक होईल. दुसरी गोष्ट मसाले आणि ग्रेव्ही बेस तयार ठेवावा. कांदा-खोबऱ्याचे वाटण, आले-लसूण पेस्ट किंवा बेसिक ग्रेव्ही आधीच करून फ्रीजमध्ये ठेवल्यास स्वयंपाकाचा अर्धा वेळ वाचतो. तिसरी गोष्ट भाजणी, पिठाची मळणी किंवा लाडू-करंजीसाठी लागणारे साहित्य (उदा. किसलेले खोबरे, भाजलेले रवा/पोहे) आधीच एकत्र करून डब्यात भरून ठेवावे.

कपडे, दागिन्यांची निवड
वसुबारसपासून ते भाऊबीजेपर्यंत कोणत्या दिवशी कोणते कपडे घालायचे आहेत, हे आधीच ठरवून इस्त्री करून ठेवावेत. साडी किंवा ड्रेसवर घालायचे मॅचिंग दागिने, बांगड्या आणि सॅंडल्स एकाच ठिकाणी सेट करून ठेवा, जेणेकरून तयार होताना वेळ वाया जाणार नाही.

एक स्मार्ट यादी बनवा
सणाच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी करायच्या छोट्या-मोठ्या गोष्टींची (उदा. दूध आणणे, फुलं आणणे, देवाला नैवेद्य दाखवणे) एक लिस्ट रात्रीच डायरीत लिहून ठेवा. यामुळे कोणतीही महत्त्वाची गोष्ट विसरली जात नाही.

स्वतःसाठी थोडा वेळ काढा
धावपळीच्या काळात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप घ्या आणि स्वतःसाठी 10 ते 15 मिनिटे काढा. तुम्ही मानसिक व शारीरिकदृष्ट्या फ्रेश असाल तर घरच्यांसोबत सणाचा आनंद द्विगुणीत होईल.

हेही वाचा – बाळाची पहिली दिवाळी अविस्मरणीय करण्यासाठी करा या खास गोष्टी



Comments are closed.