लहान मुलांना दूध बिस्किट ब्रेड द्यावे का?
आपल्याकडे काही पालक लहान मुलांना नाश्त्यामध्ये दूध, बिस्किट, ब्रेड खाण्यास देतात. त्यामुळे मुलांचे पोट भरते असे पालकांना वाटते. पण लहान मुलांना हे पदार्थ देणे कितपत योग्य आहे का? त्यातून त्यांना पौष्टीक घटक मिळतात का ? त्याचे कोणते बरे वाईट परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतात याबद्दल मात्र पालक फारसा विचार करत नाहीत. यावर तज्त्र काय सल्ला देतात ते आपण आज बघणार आहोत.
आरोग्यास हानिकारक
तज्ज्ञांच्या मते ब्रेड आणि बिस्किटमध्ये मैदा आणि पाम तेलाचा वापर केला जातो. हे दोन्ही पदार्थ आरोग्यास हानिकारक आहेत. तसेच जर मुलांना तुम्ही दूध पोळी खाण्यास देता आणि त्यात गोड चवीसाठी साखर, गूळ टाकत असाल तर मुलं दूध, ब्रेड आणि बिस्किट आवडतं म्हणून तो पदार्थ खात नसून गोड चवीसाठी खात आहे हे लक्षात घ्या. त्याची ही गोड खाण्याची इच्छा दिवसेंदिवस जास्त वाढणार हे लक्षात घ्या. त्यामुळे पुढे जाऊन मुलाला गोड पदार्थाची आवड निर्माण होऊ शकते. पण त्यातून कोणतेही पौष्टीक घटक त्याच्या पोटात जात नाहीत. एवढेच नाही तर गोड पदार्थाच्या आवडीमुळे पौष्टीक पदार्थांची चव देखील मुलांना कळेनासी होते. गोड पदार्थांपासून मुलांना लांब ठेवणे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे देखील पालकांनी लक्षात घ्यायला हवा.
चवींचे आकलन
तज्ज्ञांच्या मते मुलं जेव्हा बाहेरचे अन्न खाऊ लागतात. तेव्हा जर सुरुवातीलाच तुम्ही त्याला वेगवेगळ्या चवींचे पदार्थ खाण्यास दिले नाहीत तर त्याला चव कळत नाही. परिणामी तो फक्त त्याला आवडणाऱ्या चवीचेच पदार्थ खाण्यास उत्सुक असतो. त्यामुळे मुलांना गोड, तिखट, आंबट, खारट अशा सर्व चवीचे पदार्थ खाण्यास द्यावेत. त्यामुळे त्याला चवींचे आकलन होते. खाण्यात वेगवेगळे पदार्थ आल्याने शरीराला पौष्टीक तत्वे मिळतात.
नाश्ता
तज्ज्ञांनुसार लहान मुलांना जर तुम्ही नाश्त्यामध्ये साखर टाकून दूध पोळीच देत असाल तर ते थांबवा. नाश्त्यामध्ये तुम्ही जे खाता तेच पदार्थ त्यांना खाण्यास द्यायला सुरुवात करा. एवढेच नाही तर तुम्ही ज्या डिश किंवा पॉटमध्ये खात असाल तशाच डिश किंवा पॉटमध्ये त्यांनाही खाण्यास द्या. त्यामुळे उत्सुकतेपोटी मुलंही सगळे खात आहेत तोच पदार्थ खाण्यास सुरूवात करतील.
Comments are closed.