हजारो रुपये खर्च न करता मिळवा ब्रायडल ग्लो

लग्न म्हणजे प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक खास स्वप्न. या दिवशी आपला लूक अगदी परफेक्ट असावा, कपड्यांपासून मेकअपपर्यंत प्रत्येक गोष्ट सुंदर दिसावी, यासाठी होणारी नवरी अनेक दिवस आधीपासून तयारीला लागते. चेहऱ्याच्या सौंदर्यासोबतच हात, पाय, पाठ आणि मानेची त्वचाही नितळ आणि मऊ दिसावी, याकडे अनेकजणी विशेष लक्ष देतात. यासाठी पार्लरमध्ये फेशियल, क्लीनअप आणि बॉडी पॉलिशिंगसारख्या ट्रीटमेंट्स केल्या जातात.

पण लग्नाच्या तयारीत आधीच खूप खर्च होत असताना प्रत्येक ब्यूटी ट्रीटमेंटसाठी हजारो रुपये खर्च करणे शक्य नसते. अशावेळी घरच्या घरी उपलब्ध असलेल्या काही पदार्थांचा वापर करून त्वचेची निगा राखता येते. बेसन, दही आणि मध यांसारख्या पदार्थांपासून तयार केलेला बॉडी पॅक त्वचेला स्वच्छ आणि मऊ ठेवण्यास मदत करू शकतो. चला तर जाणून घेऊया नववधूसाठी घरच्या घरी करता येणारी सोपी बॉडी पॉलिशिंग पद्धत.

ब्रायडल ग्लोसाठी लागणारे साहित्य…
घरच्या घरी हा बॉडी पॅक तयार करण्यासाठी 2 टेबलस्पून बेसन, 1 टेबलस्पून दही, 1 टीस्पून मध, 1 टेबलस्पून ओट्सची बारीक पावडर आणि गरजेनुसार गुलाबपाणी इतके साहित्य लागणार आहे.

नेमकी कृती काय?
– सर्वप्रथम एका स्वच्छ बाऊलमध्ये बेसन, दही, मध आणि ओट्सची पावडर एकत्र करून घ्या.
– त्यामध्ये आवश्यकतेनुसार गुलाबपाणी घालून घट्टसर पेस्ट तयार करा.
– आता आंघोळीपूर्वी ही पेस्ट हात, पाय, मान आणि शरीराच्या इतर भागांवर हलक्या हाताने लावा.
– साधारण १० ते १५ मिनिटे पेस्ट त्वचेवर राहू द्या.
– त्यानंतर थोडे पाणी लावून कोणताही जोर न देता हलक्या हाताने धुवा.
– शेवटी त्वचा स्वच्छ पाण्याने धुऊन मऊ टॉवेलने पुसा आणि मॉइश्चरायझर लावा.

ब्रायडल ग्लोचे फायदे…
बेसन त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि घाण स्वच्छ करण्यास मदत करते. दह्यामुळे त्वचेला मऊपणा मिळू शकतो, तर मध त्वचेतील ओलावा टिकवण्यास मदत करतो. ओट्स त्वचेला सौम्यपणे स्वच्छ करण्यासाठी उपयोगी ठरतात. नियमित आणि योग्य पद्धतीने त्वचेची काळजी घेतल्यास त्वचा अधिक स्वच्छ, मऊ आणि तजेलदार दिसू शकते.

नववधूंनी ही काळजी घ्यावी
लग्नाच्या अगदी आदल्या दिवशी कोणताही नवीन ब्युटी उपाय करू नका. हा पॅक आधी हाताच्या छोट्या भागावर लावून पॅच टेस्ट करा. संवेदनशील, जखमी किंवा त्रासलेल्या त्वचेवर वापरणे टाळा. त्वचेची जळजळ किंवा खाज जाणवल्यास लगेच धुऊन टाका.

Comments are closed.