शुभमन गिलचा संघसहकाऱ्यावर संताप, अजिंक्य रहाणेने कॅप्टनला दाखवला आरसा!

वेलिंग्टन येथे खेळला गेलेला न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. या सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीपने न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिचेलला धावबाद करण्याची संधी गमावली होती. यावरून भारतीय कर्णधार शुभमन गिलने तीव्र संताप व्यक्त केला होता. त्याच्या या प्रतिक्रियेवर अजिंक्य रहाणेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ही घटना न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावातील ७४ व्या षटकात घडली. वॉशिंग्टन सुंदरने टाकलेल्या त्या षटकातील पहिल्या चेंडूला मिचेलने मिड-ऑनच्या दिशेने ढकलले आणि तो एकेरी धाव घेण्यासाठी धावला. दुसऱ्या टोकावर उभ्या असलेल्या टॉम ब्लंडेलने प्रतिसाद न दिल्याने मिचेल पुन्हा त्याच्या आधीच्या जागेवर येण्यास परतला. तेव्हा आकाश दीपला त्याला धावबाद करण्याची संधी होती, मात्र भारतीय खेळाडू चेंडू पकडू शकला नाही. आणि मिचेल वाचला.

मिचेलला धावबाद करण्याची सोपी संधी वाया घालवल्याने गिल निराश दिसला आणि त्याने आकाश दीपला चांगलेच सुनावले. मिचेलला बाद न करण्याचा क्षण निर्णायक ठरला. कारण मिचेलने तेव्हा ४५ चेंडू खेळून १२ धावा केल्या होत्या. सामना अनिर्णीत राहिला तेव्हा त्याने १८६ चेंडू खेळून नाबाद ४९ धावा केल्या होत्या.

गिलच्या प्रतिक्रियेबद्दल रहाणे नाराज झाला. त्याने सोनी स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले, “गिलने त्याला रागावण्याऐवजी पाठिंबा द्यायला हवा होता, कारण याचा गोलंदाज म्हणून त्याच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ शकतो.”

चेंडूकडे पाहण्याऐवजी, तुमचं लक्ष तुम्हाला कुठे गोलंदाज करायची आहे, यावर जात. त्यामुळे अशा गोष्टी घडतात. त्यामुळे मला वाटत की त्या क्षेत्ररक्षक संघसहकाऱ्याला पाठिंबा महत्त्वाचा असतो. आकाश दीपला त्याची गरज होती. ‘ये आणि गोलंदाजी कर, तेच तुला विकेट मिळवून देतील.’ त्यामुळे अशा छोट्या-छोट्या गोष्टी विसरून जाणे आणि खेळाडूला पाठिंबा देणे महत्त्वाचे असते. ती घटना घडून गेली आहे आणि तुम्ही त्याबद्दल काही करू शकत नाही. जर तुम्ही वर्तमानात आला, तर काय माहित तुम्ही कदाचित एक अप्रतिम झेल घ्याल किंवा एक-दोन विकेट्स घ्याल, असे रहाणे पुढे म्हणाला.

मिचलने ग्लेन फिलिप्ससोबत ६३ धावांची भागीदारी केली आणि सामना अनिर्णीत राखण्यात महत्त्वाची भुमिका बजावली. त्यामुळे भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.

Comments are closed.