गुकेशसमोर सिंदारोव्हचे कडवे आव्हान; जिनिव्हात आजपासून बुद्धिबळ संग्राम

एका बाजूला डोक्यावर विश्वविजेतेपदाचा मुकुट, तर दुसऱया बाजूला तो हिरावून घेण्यासाठी सज्ज असलेला महत्त्वाकांक्षी आव्हानवीर. एका बाजूला हिंदुस्थानचा युवा वाघ दोम्माराजू गुकेश, तर दुसऱया बाजूला उझबेकिस्तानचा आक्रमक जावोखिर सिंदारोव्ह. अनुभव विरुद्ध फॉर्म, जिद्द विरुद्ध आत्मविश्वास आणि मुकुटाच्या रक्षणासाठीचा संघर्ष विरुद्ध नवा सम्राट बनण्याची महत्त्वाकांक्षा… अशा जबरदस्त संघर्षाची ठिणगी मंगळवारी जिनिव्हात पडणार आहे. बुद्धिबळाच्या 64 घरांवर रंगणाऱया या महासंग्रामाकडे संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे. 2026 च्या फिडे विश्वविजेतेपदाच्या या लढतीत दोघेही 20 वर्षांचे असल्याने क्लासिकल बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेतेपदाचा सामना रंगणार आहे. 14 डावांच्या या लढतीत 12 डिसेंबरपर्यंत विश्वविजेतेपदाचा नवा इतिहास लिहिला जाणार आहे.

गुकेशची गर्जना ः पुन्हा जिंकायला आलोय!

2024 मध्ये चीनच्या डिंग लिरेनला निर्णायक डावात नमवून अवघ्या 18व्या वर्षी गुकेशने विश्वविजेतेपद पटकावले. सर्वात तरुण निर्विवाद विश्वविजेता होण्याचा विक्रमही त्याने नावावर केला. मात्र, मुकुट जिंकण्यापेक्षा तो टिकवण्याचे आव्हान अधिक कठीण असते. गेल्या काही काळातील चढ-उतारांमुळे त्याचे एलो मानांकन 2710 पर्यंत घसरले आहे. टीकाकारांनीही त्याच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले. मात्र, गुकेशचा निर्धार कायम आहे. मी इथे मुकुटाचा बचाव करण्यासाठी नव्हे, तर पुन्हा विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी आलो आहे, अशी गर्जना त्याने केली आहे. सप्टेंबरमधील बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये वैयक्तिक आणि सांघिक रौप्यपदक मिळवून त्याने पुनरागमनाचे संकेतही दिले आहेत.

सिंदारोव्हचा फॉर्म धोकादायक

गुकेशसमोर उभा असलेला सिंदारोव्हही तितकाच खतरनाक आहे. 2025 मध्ये विश्वचषक जिंकणाऱया या उझबेक खेळाडूने 2026 मधील सायप्रस कँडिडेट्स स्पर्धेत 14 डावांत 10 गुणांची कमाई करत विजेतेपद पटकावले. त्याचे एलो मानांकन 2782 असून तो जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. गुकेशपेक्षा तब्बल 72 गुणांची आघाडी त्याच्याकडे आहे. कँडिडेट्स स्पर्धा जिंकणारा पहिला उझबेक खेळाडू ठरलेल्या सिंदारोव्हने गुकेशच्या शेवटपर्यंत लढण्याच्या वृत्तीचे कौतुक केले आहे. मात्र, सामन्याचा निकाल 50-50 असल्याचे सांगत त्याने सावध भूमिकाही घेतली आहे.

आकडे सिंदारोव्हच्या बाजूने, अनुभव गुकेशच्या पाठीशी

दोघांमधील यापूर्वीच्या क्लासिकल लढतींमध्ये सिंदारोव्हकडे 2.5-0.5 अशी आघाडी आहे. मात्र, हे विजय 2018 आणि 2022 मधील असल्याने त्यांचे महत्त्व मर्यादित आहे. गुकेशकडे विश्वविजेतेपदाचा सामना खेळण्याचा अनुभव आहे, तर सिंदारोव्हकडे सध्याच्या फॉर्मची ताकद आहे. पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद यानेही ही लढत 50-50 असल्याचे मत व्यक्त केले आहे. पहिला निर्णायक डाव, मानसिक दबाव आणि नवी तयारी हे निकालाचे प्रमुख घटक ठरतील.

गुकेशसमोर इतिहास घडवण्याची संधी आहे. 2024 मध्ये जगाला चकित करून विश्वविजेता बनलेला हा हिंदुस्थानी युवा ग्रँडमास्टर आता आपले साम्राज्य टिकवण्यासाठी उतरतो आहे. सिंदारोव्ह मात्र केवळ आव्हान देण्यासाठी आलेला नाही; त्याला बुद्धिबळाच्या जगाचा नवा सम्राट व्हायचे आहे. 64 घरांचा पट सजला आहे. प्रत्येक चाल इतिहास लिहिणार आहे. प्रत्येक चुकीची किंमत मोजावी लागणार आहे आणि प्रत्येक विजय विश्वविजेतेपदाच्या मुकुटाच्या आणखी जवळ नेणार आहे. उद्यापासून जिनिव्हात सुरू होणारी ही लढत केवळ गुकेश विरुद्ध सिंदारोव्ह नाही; ती हिंदुस्थानच्या बुद्धिबळाच्या प्रतिष्ठsची आणि नव्या उझबेक आव्हानाची महासंग्रामाची कहाणी आहे.

14 डावांची अग्निपरीक्षा

 एकूण 14 शास्त्राrय डाव खेळवले जातील.
 24 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान स्पर्धा
 प्रत्येक दिवशी एक डाव, सलग तीन डावांनंतर एक दिवस विश्रांती
 प्रथम 7.5 गुण मिळवणारा विश्वविजेता.
 विजयासाठी 1 गुण, बरोबरीसाठी अर्धा गुण.
 14 डावांनंतर 7 -7 अशी बरोबरी झाल्यास 12 डिसेंबरला टायब्रेक.
 प्रत्येक डावासाठी पहिल्या 40 चालींना 2 तास, त्यानंतर 30 मिनिटे आणि 41व्या चालीपासून चालीला 30 सेकंद वाढीव वेळ.

Comments are closed.