जेएनपीए बंदराची वाहतूक कोलमडली; दहा तास कोंडी, तीन हजारांहून अधिक कंटेनर्स अडकले, निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दिवाळी तसेच छठपूजेच्या निमित्ताने सुट्टीवर गावी गेलेले ४० टक्के टीटी वाहनचालक परतलेच नाहीत. त्यामुळे चालकांची कमतरता निर्माण झाली असून जेएनपीए बंदराची वाहतूक कोलमडली आहे. आज तब्बल दहा तास तुफान कोंडी झाली होती. बंदराजवळच तीन हजारांहून अधिक कंटेनर्स अडकून पडल्याने जेएनपीए प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. परदेशात जाणाऱ्या या कंटेनर्समध्ये कोट्यवधी रुपयांचा माल आहे. लवकरात लवकर ही कोंडी दूर न झाल्यास निर्यातीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

जेएनपीए हे प्रमुख बंदर असून तेथून मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या मालाची निर्यात अनेक देशांमध्ये केली जाते. या बंदरामध्ये १ कोटी हाताळण्याचे उद्दिष्ट जेएनपीए प्रशासनाने ठेवले आहे. पण अरूंद रस्ते आणि अन्य काही कारणांमुळे हे उद्दिष्ट प्रशासनाला पेलवत नसल्याचा दावा महाराष्ट्र हेवी व्हेईकल अॅण्ड इंटरस्टेट कंटेनर ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पैठणकर यांनी केला आहे. एकीकडे अरूंद रस्ते व दुसरीकडे चालकांचा निर्माण झालेला तुटवडा यामुळे गेल्या काही दिवसांपासून जेएनपीए बंदराला वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.

वरिष्ठ व्यवस्थापकांचा दावा
जेएनपीए बंदरात चालकांच्या तुटवड्यामुळे कंटेनर्सची वाहतूक बंद पडली असल्याचे दिसत असतानाही वरिष्ठ व्यवस्थापक गिरीश थॉमस यांनी मात्र बंदरातील वाहतूक सुरळीत सुरू असल्याचा दावा केला आहे. पण प्रत्यक्षात जेएनपीए बंदराजवळ मोठ्या प्रमाणावर कंटेनर्सची रांग लागल्याचे दिसून येत आहे.

वाहनचालकांची कमतरता, जेएनपीए परिसरात दररोज होणारी वाहतूककोंडीची समस्या आणि व्यवसायात झालेली घसरण, वाहनचालकांच्या कमतरतेमुळे ४० टक्के वाहने उभी करण्यात आली आहेत.
कंटेनर वाढीनंतर अपुऱ्या पायाभूत सुविधा, अरुंद रस्ते आदी बाबीही कारणीभूत ठरत असल्याचा गंभीर आरोपही ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून करण्यात येत आहे.

जेएनपीए बंदरात होणाऱ्या ट्रॅफिक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी उद्या मंगळवारी नवी मुंबई वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला संबंधित अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

Comments are closed.