हिंदुस्थानच्या विजयस्वप्नाला न्यूझीलंडचा सुरुंग, मिचेल-फिलिप्सची अभेद्य भिंत; वेलिंग्टन कसोटी अनिर्णित
हिंदुस्थानी गोलंदाजांनी विजयासाठी अखेरपर्यंत प्रयत्नांची शिकस्त केली, नव्या चेंडूवर चमत्काराची आशाही बाळगली, जुन्या चेंडूनेही प्रतिस्पर्ध्याला सतावले, पण न्यूझीलंडच्या फलंदाजांनी बचावाचा असा काही किल्ला लढवला की हिंदुस्थानचे विजयस्वप्न अखेर अधुरेच राहिले. वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंडने तब्बल 120 षटके फलंदाजी करत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. अखेरीस गोलंदाजांपेक्षा खेळपट्टीच किवींच्या बचावासाठी सर्वात मोठी साथीदार ठरली. मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी उभारलेल्या भागीदारीच्या भिंतीला हिंदुस्थानी आक्रमक एक भेगही पाडू शकले नाही. परिणामता हिंदुस्थानच्या विजयस्वप्नांना यजमानांनी सुरुंग लावला.
अखेरच्या दिवशी हिंदुस्थानला विजयासाठी फक्त आठ चांगल्या चेंडूंची आवश्यकता होती, मात्र खेळपट्टीवर गोलंदाजांना फारशी साथ मिळालीच नाही. चेंडूची धार बोथट होत चालली होती आणि फलंदाजांना बाद करणे अधिकाधिक कठीण बनत होते. तरीही वॉशिंग्टन सुंदरने डेव्हन कॉनवेचा बॅट-पॅड झेल मिळवला. रचिन रवींद्रला प्रसिध कृष्णाने बाद केले, तर अंशुल कंबोजने टॉम ब्लंडेलला बाद करून हिंदुस्थानच्या विजयाच्या आशा पुन्हा जागवल्या.
या आशा फार काळ तग धरू शकल्या नाहीत. कारण त्यानंतर डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी हिंदुस्थानी गोलंदाजांचा अक्षरशः संयम तपासला. दोघांनी तब्बल 43 षटके फलंदाजी करत सामना अनिर्णित राखला. मिचेलने 186 चेंडूंचा सामना करत नाबाद 49 धावा केल्या, तर फिलिप्सने 126 चेंडू खेळून नाबाद 29 धावा करत त्याला साथ दिली. मिचेलचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले, पण संघाला पराभवापासून वाचवण्याचे त्याचे मिशन मात्र यशस्वी झाले.
या जोडीने हिंदुस्थानी गोलंदाजांना अक्षरशः थरथरायला लावले. चहापानापूर्वी सलग आठ षटके निर्धाव गेली, तर चहापानानंतर तब्बल 43 चेंडूंवर एकही धाव निघाली नाही. फलंदाजीपेक्षा विकेट वाचवण्यालाच सर्वोच्च प्राधान्य देणाऱया किवींच्या या रणनीतीने हिंदुस्थानी गोलंदाजांची कसोटी पाहिली.
जसप्रीत बुमराने कामाचा ताण लक्षात घेऊन तीन षटकांपेक्षा मोठे स्पेल टाकले नाहीत. तरीही त्याने या कसोटीत एकूण 49 षटके टाकत पाच विकेट मिळवले. त्याची कारकीर्दीतील गोलंदाजीची सरासरी 19.94 झाली. हिंदुस्थानने अखेरीस अनिर्णित निकाल स्वीकारला. निर्धारित 15 षटके शिल्लक असतानाच सामना संपवण्याचा निर्णय झाला. विशेष म्हणजे, अर्धशतकापासून एक धाव दूर असलेला मिचेलही पुढे फलंदाजी करण्यास उत्सुक नव्हता. संघाचा पराभव टाळणे हेच त्याच्यासाठी वैयक्तिक अर्धशतकापेक्षा मोठे होते. या निकालामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत हिंदुस्थानची कोंडी आणखी वाढली. तब्बल 720 धावा दिल्यानंतरही हिंदुस्थानला चार गुण मिळाले. मात्र न्यूझीलंडला गुणतालिकेत तिसऱया स्थानावर घसरावे लागले.
Comments are closed.