‘सीएसएमटी’च्या पुनर्विकासात 128 झाडांवर कुऱ्हाड, 56 झाडे कापणार तर 72 झाडांचे पुनर्रोपण

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पासाठी परिसरातील तब्बल 128 झाडे प्रभावित होणार आहेत. यापैकी 56 झाडे तोडण्यात येणार असून 72 झाडांचे अन्यत्र पुनर्रोपण केले जाणार आहे. यासाठी रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे वृक्षतोडीची परवानगी मागितली होती. हा प्रस्ताव शुक्रवारी वृक्ष प्राधिकरण समितीने मंजूर केला. दुसऱयांदा समितीपुढे हा प्रस्ताव मंजुरीसाठी आला.

या कामासाठी परिसरातील काही झाडे हटविणे आवश्यक असल्याचे रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने प्रस्तावात म्हटले आहे. याआधी याच भूखंडावरील 66 झाडे तोडण्यास, 180 झाडांचे पुनर्रोपण करण्यास आणि 256 झाडे आहे त्याच ठिकाणी सुरक्षित ठेवण्यास वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिली होती, मात्र प्रत्यक्ष पाहणीदरम्यान जागेवरच सुरक्षित ठेवण्याचे ठरवण्यात आलेल्या 256 झाडांपैकी 14 झाडे संबंधित भूखंडावर आढळली नाहीत.

csmt स्थानकाचा पुनर्विकास अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) पद्धतीने करण्यात येणार आहे. नवीन लावण्यात आलेल्या झाडांचे सात वर्षांपर्यंत जतन–संवर्धन संबंधित विकासाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विरोधकांचा आक्षेप

या परिसरात आधी झालेल्या वृक्षछाटणीनंतर जी झाडे लावली ती कुठेच दिसत नाहीत याबाबतचा मुद्दा वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्य आणि महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. सीएसएमटी स्टेशन 1888 साली उभारण्यात आले. 1950 च्या सुमारास त्याचा विस्तार झाला. या प्रस्तावात एकही झाड 50 वर्षांपेक्षा अधिक वयाचे नाही, याकडे नगरसेवक प्रमोद सावंत लक्ष वेधले.  संख्याबळाच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

अशी होणार वृक्षतोड

56 झाडे कापणे व 72  झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे.   कापण्यात येणाऱया झाडांच्या बदल्यात
15 दिवसांत 2463 झाडे लावली जाणार आहेत.

ही झाडे आरपीएफ बॅरेक, ठाकुर्ली पूर्व, 14202
चौ. मी. इतक्या क्षेत्रावर तसेच मोग्लिचे डॅम, दिघा येथील 11431 चौरस मीटर क्षेत्रावर अशी एकूण 25633 चौरस मीटर क्षेत्रांवर पारंपरिक पद्धतीने लावण्यात येणार आहेत. नवीन लावण्यात आलेल्या झाडांचे सात वर्षांपर्यंत जतन-संवर्धन संबंधित विकासकामार्फत करण्यात येईल.

प्रत्यक्ष पाहणीनंतर निर्णय

झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी व रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाच्या प्रतिनिधींनी संयुक्तपणे संबंधित परिसराची पाहणी केली. प्रत्यक्ष पाहणीत संबंधित भूखंडावर एकूण 242 झाडे आढळली. त्यापैकी 128 झाडे पुनर्विकासाच्या कामामुळे प्रभावित होणार असल्याचे स्पष्ट झाले.

Comments are closed.