लिफ्ट बंद, पदभरती रखडली; केईएमच्या ढिसाळ कारभाराविरोधात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

केईएम रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराविरोधात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची आंदोलनाची हाक दिली आहे. केईएममधील लिफ्ट बंद पडल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. कामगारांची कमतरता असल्यामुळे लिफ्टची दुरुस्ती- मेंटनन्स रखडले आहे. येत्या 15 दिवसांत यांत्रिकी-विद्युत विभागातील रिक्त जागा तातडीने भराव्यात आणि रुग्णांना सुविधा द्याव्यात अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने दिला आहे.

केईएम रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये सात लिफ्ट आहेत.  त्यातील कक्ष क्र. 4 समोरील दोन लिफ्ट बरीच वर्षे बंद आहेत. कक्ष क्र. 1 च्या समोरील लिफ्ट  बंद आहेत. एक्स-रे विभागातील एक लिफ्ट कधी बंद तर कधी चालू असते.  ए.के.डी. इमारतीतील लिफ्टदेखील बंद असतात. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक व कार्यरत कर्मचाऱयांना  त्रास सहन करावा लागत आहे.  संबंधित विभागाला तक्रारी करूनसुद्धा कामगार कमरतेमुळे दखल घेतली जात नाही, याकडे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने लक्ष वेधले आहे.

केईएममध्ये इलेक्ट्रिशियन, वायरमन, पंपमन, लिफ्टचालक अशी अनेक पदे मागील काही वर्षांपासून भरलेली नाहीत. त्यामुळे ठेकेदारामार्फत सर्व कामे केली जातात.  संबंधित विभागाने कायमस्वरूपी रिक्त जागा भराव्यात, जेणेकरून  लिफ्टचे काम सुरळीत होईल आणि रुग्ण तसेच कामगार, कर्मचाऱयांना त्रास होणार नाही.   येत्या 15 दिवसांत केईएम रुग्णालय प्रशासनाने योग्य तो निर्णय न घेतल्यास युनियनचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन छेडले जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी केईएम रुग्णालय प्रशासनावर राहील, असा इशारा युनियनचे चिटणीस संजय वाघ यांनी दिला आहे.

Comments are closed.