Himachal Landslide | धावत्या टाटा सुमोवर दरड कोसळून 13 ठार हिमाचलमधील भीषण दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल

► वृत्तसंस्था चंबा
हिमाचल प्रदेशातील चंबा जिह्यातील पांगी या आदिवासी भागात शुक्रवारी एक मोठा अपघात झाला. किलाड-उदयपूर रस्त्यावरील काडू नालाजवळ धावत्या टाटा सुमोवर डोंगराचा एक मोठा भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत वाहनाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. तसेच टाटा सुमोमधून प्रवास करणारे 13 पर्यटक प्रवासीही दगडांखाली गाडले गेल्यामुळे मृत झाले.

या अपघातामुळे परिसरात घबराट पसरली आणि तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. भरमौर-पांगीचे आमदार डॉ. जनक राज यांनी अपघातात 13 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली. अपघातानंतर स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून, ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा सुमो किलाड-उदयपूर मार्गावरून जात असताना हा अपघात झाला. डोंगरावरून मोठ्या प्रमाणात दगड आणि ढिगारा अचानक वाहनावर कोसळल्याने त्याचे मोठे नुकसान झाले. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात टाटा सुमो वाहनावर भलेमोठे दगड पडलेले दिसत आहेत.

प्रशासन सध्या बचाव आणि मदतकार्यात गुंतले असून, अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. तसेच मृतांची ओळख पटवण्याचे कामही सुरू आहे. प्रशासनाने लोकांना खराब हवामानात डोंगराळ रस्त्यांवरून प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती भागात उदयपूर-किलाड रस्त्यावरील काडू नालाजवळ भूस्खलन झाले असतानाच अन्य राज्यांमध्येही दुर्घटनांचे सत्र सुरू आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक जिह्यांमध्ये हाहाकार माजला आहे. वलसाडमधील उमरगाम तालुक्यात 16 तासांत 43 इंच पावसाने सखल भागांना पूर आला आहे. नवसारीमध्ये अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात आले.

अहमदाबाद आणि सुरतमध्ये पूर आला असून जिह्यातील बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. उत्तर प्रदेशात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगा आणि यमुना नद्यांसह 10 नद्यांना पूर आला आहे. सीतापूरमधील रस्ते पाण्याखाली गेल्याने लोकांना बोटीने प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, राजस्थानमधील बांसवाडा आणि डुंगरपूरसह 11 जिह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Comments are closed.