स्पेनच्या कॅनरी बेटांजवळ बोटीवर 14 स्थलांतरितांचा मृत्यू तर 6 जण जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

स्पेनच्या कॅनरी बेटांजवळ समुद्रातून वाचवण्यात आलेल्या एका बोटीत किमान चौदा स्थलांतरित मृत आढळल्याची माहिती सागरी बचाव अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. या बोटीवर सुमारे 100 लोक होते. या दुर्घटनेत इतर सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी विमानाने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, एल हिएरो बेटाच्या दक्षिणेला 39 सागरी मैल अंतरावर ही बोट सापडली. बोटीवर 14 मृतदेह आढळले असून तिला ला एस्टाका बंदराकडे ओढून आणले जात होते. गंभीर जखमी झालेल्या सहा स्थलांतरितांना हेलिकॉप्टरने एल हिएरो येथे नेण्यात आले, तर एका मुलासह इतर 84 जणांना ला रेस्टिंगा समुद्रकिनाऱ्यावर सुखरूप उतरवण्यात आले. एका व्यक्तीने मात्र बोटीवरच थांबण्याचा निर्णय घेतल्याचे सागरी बचाव सेवेने स्पष्ट केले आहे. मदतकार्यासाठी सिव्हिल गार्डचे अधिकारी, रेड क्रॉसचे कार्यकर्ते आणि लष्कराच्या आपत्कालीन प्रतिसाद पथकातील जवान तैनात होते. काही वाचलेल्यांना स्ट्रेचरवर किनाऱ्यावर आणण्यात आले, तर इतरांना थंडीपासून बचाव करण्यासाठी थर्मल ब्लँकेटमध्ये गुंडाळण्यात आले.

स्पेनच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात स्थलांतर हा प्रमुख मुद्दा बनला असतानाच ही दुःखद घटना घडली आहे. पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांचे सरकार देशाच्या सीमांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप उजव्या विचारसरणीच्या विरोधकांनी केला असून उदारमतवादी स्थलांतर धोरणावर टीकेची झोड उठवली आहे. स्पॅनिश गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी ते 15 नोव्हेंबरदरम्यान कॅनरी बेटांवर 24 हजार 364 स्थलांतरित दाखल झाले आहेत, तर 2025 मध्ये याच कालावधीत हा आकडा 14 हजार 690 होता. केवळ नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातच 11 हजारहून अधिक स्थलांतरित पोहोचले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, 25 नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात विक्रमी 2 हजार 100 स्थलांतरित या द्वीपसमूहावर आले; त्यातील बहुतांश सुमारे 11 हजार 400 लोकसंख्या असलेल्या एल हिएरो बेटावर दाखल झाले.

Comments are closed.