कार्तिकी यात्रेच्या सांगता समारंभानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रक्षाळ पूजा; 5 हजार किलो फुलांनी मंदिर सजले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कार्तिकी यात्रा 2026 च्या सांगता समारंभानिमित्त आज शनिवार, 28 नोव्हेंबर रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रक्षाळ पूजा करण्यात येत आहे. आषाढी आणि कार्तिकी यांसारख्या मोठ्या यात्रांच्या काळात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात. या कालावधीत श्रींच्या नित्योपचारांसह विविध धार्मिक विधी पार पडतात. यात्रेची सांगता झाल्यानंतर श्रींच्या नित्योपचारांमध्ये नियमितता आणण्यासाठी प्रक्षाळ पूजा केली जाते. मंदिराच्या धार्मिक परंपरेत या पूजेला विशेष महत्त्व आहे.

प्रक्षाळ पूजेचे औचित्य साधून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासह संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. अमोल शेरे आणि अभिजित मोहिते यांच्या सहकाऱ्यांनी ही देखणी पुष्पसजावट साकारली असून, त्यासाठी सुमारे ५ हजार किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे.

या सजावटीमध्ये गुलाब, झेंडू, शेवंती, लिली, गलांडा, आष्टर, ऑर्किड, गॅलोडा, जिनो, कार्नेशियन अशा 30 हून अधिक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांसह विविध आकर्षक पानांचा समावेश करण्यात आला आहे. विविध रंगसंगती आणि कलात्मक पुष्परचनांमुळे श्री विठ्ठल मंदिर, श्री रुक्मिणी माता मंदिर तसेच संपूर्ण मंदिर परिसराला मनमोहक स्वरूप प्राप्त झाले आहे, अशी माहिती व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.

प्रक्षाळ पूजेच्या धार्मिक सोहळ्यासोबतच फुलांनी सजलेले मंदिर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. ही सुंदर पुष्पसजावट पाहण्यासाठी दिवसभर भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती, अशी माहिती कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.

Comments are closed.