राष्ट्रवादी काँग्रेसने जर मोदी शहाच्या बाजूने मतदान केलं तर त्यांना हा महाराष्ट्र माफ करणार नाही – संजय राऊत

डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निर्णयावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. ”ज्या अमित शहा व नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा पक्ष फोडला, कुटुंब फोडलं. त्यांच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान गहान ठेवण्याचा विषय असू शकतो राष्ट्रवादी काँग्रेसने जर मोदी शहाच्या बाजूने मतदान केलं तर त्यांना हा महाराष्ट्र माफ करणार नाही”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

”महाविकास आघाडी म्हणून तुमचे आठ खासदार निवडून आले आहेत. त्यात शिवसेना काँग्रेस आहे. भाजप नाही. तुम्हाला निवडून आणण्य़ात. आठ पैकी पाच ठिकाणी आपण भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. अशा वेळी आपण एकतर्फी निर्णय घेऊन सरकारच्या बाजून उभे राहत असाल तर हे महाराष्ट्राची जनता सहन करेल असं वाटत नाही. ज्या अमित शहा व नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा पक्ष फोडला, कुटुंब फोडलं. त्यांच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान गहान ठेवण्याचा विषय असू शकतो”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

”जर आपण भाजपला मदत करण्याच्या भूमिकेत जाणार असाल तर या पक्षाने अनिल देशमुखांची माफी मागायला पाहिजे. या भाजपमुळे अनिल देशमुख तुरुंगात गेले. नवाब मलिक अनिल देशमुख या दोघांची यांनी माफी मागायला हवी. आताची काही लोकं भाजपशी अशा प्रकारे सत्तेसाठी हातमिळवणी करणार असतील तर हा महाराष्ट्र महाराष्ट्र राहणार नाही. महाराष्ट्राचे अध:पतन करण्याचे काम मोदी शहांनी हाती घेतलेले आहे. त्यांचे हात बळकट करणं हा महाराष्ट्र, मराठी माणसाशी केलेला द्रोह आहे. आम्ही हा सहन करणार नाही”, असेही संजय राऊत यांनी सुनावले आहे.

”जर तुम्ही महाराष्ट्राचे शत्रू अमित शहा आणि नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याची भूमिका देणार असाल. ज्या इंडिया ब्लॉकमध्ये तुम्हा मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्याविरोधात तुम्ही एकतर्फी भूमिका घेणार असाल तर तुम्हाला भाजपमध्येही स्थान राहणार नाही आणि इंड़िया आघाडीतही स्थान राहणार नाही. शरद पवारांनी गेल्या 60 वर्षात जी उत्तुंग झेप राजकारणात घेतली. त्यांच्या हयातीत त्यांच्या सहकाऱ्यांनी नष्ट केली. या लोकांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की अमित शहांना पाठिंबा देण्याला शरद पवार यांची संमती आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

”पवार साहेबांची फुले शाहूं आंबेडकरांसंदर्भात जी विचारधारा आहे ती पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्या सहकाऱ्यांची होती. त्यांच्या सहकाऱ्यांनी माती खाल्ली आहे. ज्यांना पवार साहेबांनी मोठं केलं. त्यांना सत्तेची भूख लागली आहे. त्यामुळे त्यांनी ही माती खाल्ली आहे”, असेही ते म्हणाले.

”गेल्या काही काळ शरद पवार सातत्याने मोदी शहा धर्मांध शक्तींविरोधात लढत आहेत, त्यांनी कधीच कोणाशाही हातमिळवणी केली असं मला वाटत नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे, जयंत पाटील, इतर खासदारांच्या प्रचारला अमित शहा, मोदी आले नव्हते. तुमच्या प्रचाराला उद्धव ठाकरे, राहुल गांधी आले होते. मोदी शहांचा पराभव व्हावा म्हणून तुम्हाला मतदान झालं आहे. अशा वेळेल तुम्ही त्यांच्या पायाशी जाऊन बसणं ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला लागलेली ठेच आहे. तुमच्या मुळे अमित शहाला फायदा होईलच पण यात महाराष्ट्राचं नुकसान होईल. भविष्यात या राज्याची जनता कधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षावर विश्वास ठेवणार नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

“डिलिमिटेशनसाठी आमचे सहा खासदार फोडले. म्हणून काय आम्ही मोदी शहांच्या पायाशी गेलो नाही. आमदार खासदार येतील जातील. पक्ष फुटतील, पक्ष उभे राहतील पण देश आणि महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. विचारधारा महत्त्वाची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी सद्विवेक बुद्धी न ठेवता महाराष्ट्राच्या विरोधात मतदान केलं तर आम्ही रान उठवू या महाराष्ट्रात. ही व्यापारी लोकं आहेत. या भाजपने या देशाच्या राजकारणाचा व्यापार केला. राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी शहाच्या बाजूने मतदान करू द्या मग त्यांना कळेल महाराष्ट्र काय आहे, त्यांना हा महाराष्ट्र माफ करणार नाही. यांचे हे जे लोक शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात त्यांना त्यांची नाव घेण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्राशी झालेली बेईमानी मराठी माणूस सहन करणार नाही”, असेही ते म्हणाले.

”देशात या बिलाला मतदान करणाऱ्याला दीडशे कोटींचा भाव चालू आहे. दीडशे कोटीला खासदार विकले गेले आहेत. नॅशनल हॉर्स स्टॉक एक्सजेंज. खासदारांचा घोडेबाजार सुरू आहे आणि खासदार विकले जात आहेत. भारत एक देश फार महान आहे. या देशाने महाभारत, रामायण, अनेक संघर्ष, स्वातंत्र्य लढा पाहिलेला आहे. जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वातला लढा पाहिलेला आहे. आता आम्ही एक लढा उभारलेला आहे”, असेही त्यांनी सांगितले.

”आता पर्यंत महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही विधेयकाला थेट पाठिंबा देण्याचा काम राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. जे चुकीचं आहे. याचं समर्थन करता येणार नाही. त्याचे जर कुणी खुलासे करणार असतील तर जनता तुमची पाठ काढेल. यांच्या बहुसंख्य मतदारसंघात शिवसेनेचा प्रभाव आहे. शिरूरचा मतदारसंघांत अमोल कोल्हे शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय जिंकू शकत नाही. आम्ही लढू त्या जागा. माढा मतदारसंघातही आमची ताकद आहे. आम्ही लढू आणि महाराष्ट्र काय आहे ते दाखवून देऊ”, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

Comments are closed.