भडका उडताच गल्लीबोळात जाणार फायर बाईक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अरुंद गल्लीबोळ आणि दाट लोकवस्तीच्या परिसरात आग लागल्यास अग्निशमन दलाच्या मोठ्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचविण्यासाठी उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात आता आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज चार ‘फायर बाईक’ दाखल झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील अरुंद रस्ते आणि दुर्गम वस्त्यांमध्ये आगीचा भडका उडाल्यास आता नो टेन्शन राहणार आहे.

अग्निशमन संचालनालयामार्फत राज्यातील विविध महानगरपालिकांच्या अग्निशमन विभागांना आधुनिक ‘फायर मोटरसायकल’ उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उल्हासनगर पालिकेलाही चार फायर बाईक आणि अधिकाऱ्यांच्या वापरासाठी एक बोलेरो वाहन मिळाले आहे. या वाहनांचे विधिवत पूजन महापौर ॲड. अश्विनी कमलेश निकम, महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे, उपमहापौर अमर लुंड, राजेश वधारिया, मुख्य लेखाधिकारी नितल लव्हाळे, मुख्य लेखा परीक्षक सुषमा पाटील, उपायुक्त मुख्यालय डॉ. दीपाली चौगुले यांच्या उपस्थित करण्यात आला.

नागरिकांचा जीव वाचणार

बाजारपेठा, दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्त्यांमुळे मोठ्या अग्निशमन वाहनांना पोहोचणे कठीण होते. अशा ठिकाणी फायर बाईकच्या माध्यमातून अग्निशमन जवानांना तातडीने घटनास्थळी पोहोचून प्राथमिक स्तरावर आग नियंत्रणात आणण्यास मदत होणार असून रहिवाशांचा जीव वाचणार आहे.

Comments are closed.