सिगारेट ओढल्याचा जाब विचारला, धावत्या लोकलमध्ये तिघांचा प्रवाशावर चाकू हल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रेल्वेच्या लगेज डब्यात सिगारेट आणि विडी ओढल्याचा जाब विचारल्याने तीन तरुणांनी धावत्या लोकलमध्ये प्रवाशावर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ठाकुर्ली स्थानकात घडली. या हल्ल्यात भरत टोपले यांच्या चेहऱ्यावर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर तिघेही आरोपी ठाकुर्ली स्थानकात उतरून पसार झाले. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे शहाड प्रतिनिधी भरत टोपले हे सकाळी रेल्वेने प्रवास करत असताना खडवली स्थानकाजवळ लगेज डब्यात तीन तरुण चढले. त्यापैकी एकाने डोक्यावर कॅप, तर दुसऱ्याने निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. हे तरुण डब्यात सिगारेट आणि विडी ओढत असल्याचे पाहून टोपले यांनी त्यांना रोखले. याचा राग मनात धरून ठाकुर्ली रेल्वे स्थानकात तिघांनी टोपले यांच्या चेहऱ्यावर चाकूने वार केले आणि स्थानकात उतरून पळ काढला. या हल्ल्यात त्यांच्या नाकाजवळ गंभीर दुखापत झाली.

ऑनलाईन तक्रार

आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनगाव आणि सरचिटणीस श्याम उबाळे यांनी केली आहे. या प्रकरणी ऑनलाईन तक्रारही दाखल करण्यात आली आहे. लवकरच मध्य रेल्वेचे पोलीस आयुक्त आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

जखमी भरत टोपले यांच्याशी बोलणे झाले असून ते उपचारासाठी खासगी रुग्णालयात गेले आहेत. आरोपींचा शोध लावून कारवाई केली जाईल.
— बाळासाहेब थोरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली लोहमार्ग पोलीस

Comments are closed.