कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या लोकलला रेड सिग्नल, ‘मरे’ म्हणते आधी फलाटांची लांबी वाढवू द्या !

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कर्जत मार्गावर १५ डब्यांच्या लोकलला सुरुवात होत असताना कल्याण कसारा मार्गावरील प्रवाशांना अद्याप या सुविधेपासून वंचित ठेवण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. १५ डब्यांच्या लोकलला कर्जत मार्गावर ग्रीन सिग्नल मात्र कसारा मार्गावर रेड सिग्नल दिल्याने प्रवाशांमध्ये संताप आहे. त्यामुळे कर्जतप्रमाणेच कसारा मार्गावरही तातडीने १५ डब्यांच्या लोकल सुरू कराव्यात, अशी मागणी कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केली. यावर ‘मरे’ने कल्याण-कसारा मार्गावरील फलाटांची लांबी आधी वाढवू द्या, मगच या मार्गावरही १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याचे नियोजन असल्याचे म्हटले आहे.

मे २०२५ मध्ये कर्जत आणि कसारा या दोन्ही मार्गांवर एकाच वेळी १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र कर्जत मार्गावरील फलाटांची लांबी वाढवण्याचे काम पूर्ण झाले असताना कसारा मार्गावरील स्थानक विस्तारीकरणाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने या मार्गावरील प्रवाशांवर अन्याय होत आहे. यासंदर्भात कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन दिले.

कल्याण-कसारा मार्गावर तातडीने १५ डब्यांच्या लोकल सुरू कराव्यात, तसेच स्थानक विस्तारीकरणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावर रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण दिले आहे. कल्याण-कसारा मार्गावर काही स्थानकांवरील फलाटांची लांबी अपुरी असल्याने सध्या १५ डब्यांच्या लोकल चालवणे शक्य नसल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. फलाट विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरही १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याचे नियोजन असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

रेल्वे प्रशासनाकडून दुजाभाव
प्रवासी संख्या, उत्पन्न चांगले असूनही रेल्वे बोर्ड आणि रेल्वे प्रशासन कसारा मार्गावर सातत्याने दुजाभाव करत असल्याचा आरोप कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी केला आहे. या मार्गावर लोकलपेक्षा मेल एक्स्प्रेस गाड्यांची संख्या अधिक असल्याने एक ते दोन तासांच्या अंतरानेच लोकल उपलब्ध होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी असून कोणत्याही क्षणी उद्रेक होऊ शकतो. रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन कसारा मार्गावर लवकरात लवकर १५ डब्यांच्या लोकल सेवा सुरू कराव्यात, अशी मागणी राजेश घनघाव यांनी केली आहे.

Comments are closed.