अलिबागमधील सिमेंट प्रकल्पासाठी १६ गुंठे जमीन अदानीला
तालुक्यातील शहापूर, शहाबाज परिसरात प्रस्तावित ‘रायगड सिमेंट बल्क टर्मिनल’ प्रकल्पासाठी अदानी सिमेंटेशन लिमिटेडला १६.१४ गुंठे वनजमीन देण्यात आली आहे. महसूल व वनविभागाने सोमवारी याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. या जमिनीचा वापर बर्थिंग जेट्टी, कन्व्हेयर कॉरिडॉर, बॅकअप सुविधा आणि अप्रोच रोडसाठी करण्यात येणार आहे.
केंद्राच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयाने २९ ऑक्टोबर २०२१ रोजी या वनजमीन वळवण्यास ‘इन-प्रिन्सिपल’ मंजुरी दिली होती. त्यानंतर आवश्यक अटींची पूर्तता केल्यानंतर २४ ऑक्टोबर २०२५ रोजी अंतिम मंजुरी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आता वनजमीन वळवण्याचा आदेश काढला आहे. त्यानुसार शाहबाज येथील सर्व्हे क्रमांक ३४६, शहापूरमधील सर्व्हे क्रमांक ६०० आणि ६०२ मधील १६.१४ गुंठे वनजमीन वगळण्यात आली आहे.
वनजमीन प्रत्यक्ष ताब्यात देण्यापूर्वी केंद्र शासनाच्या अंतिम मंजुरीतील सर्व अटींची पूर्तता झाली आहे की नाही याची खात्री करण्याची जबाबदारी अलिबागचे उपवन संरक्षक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ठाण्याचे मुख्य वनसंरक्षक यांनी अदानी सिमेंटेशनकडून अटींचे काटेकोर पालन होत असल्याची खातरजमा करून वेळोवेळी अहवाल सादर करायचा आहे.
Comments are closed.