चंपत राय यांच्यासह १७ जण संशयाच्या भोवऱ्याखाली
अयोध्या राम मंदिरातील दानचोरीसंबंधी एसआयटीचा दावा : अंतिम अहवालाची प्रतीक्षा
वृत्तसंस्था/ लखनौ
अयोध्या येथील राम मंदिरातील दानचोरीचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे हे प्रकरण अधिकच रंजक होत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणावर लागले आहे. एसआयटीने आपला अहवाल पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) सादर केला असून, त्यात चंपत राय यांच्यासह 17 जणांची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. तथापि, हा तपासाचा पहिला मसुदा असून तूर्तास त्याबद्दल सविस्तर काहीही बोलता येणार नाही, असे एसआयटीने म्हटले आहे.
अयोध्या येथील राम मंदिरातील कथित दानचोरीच्या तपासानंतर, एसआयटीने आपला प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या अहवालात अनेक अनियमिततांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. एसआयटीने हुंडी, ऑनलाईन आणि कॅश काउंटरवरील पावत्या यांसारख्या देणग्या स्वीकारण्याच्या पद्धतींचाही उल्लेख केला आहे. एसआयटीला राम मंदिर ट्रस्टच्या बँक खात्यांमधून आणि चौकशीतून असे समजले की, दरमहा सरासरी 25 लाख भाविक राम मंदिराला भेट देतात, परंतु कुंभमेळ्यादरम्यान एकाच महिन्यात जवळपास 1 कोटी भाविकांनी भेट दिली होती.
प्रत्येक भाविकाकडून सरासरी 15-18 रुपये दान म्हणून मिळतात, परंतु धान्य, तेल आणि तूप, तसेच सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा यात समावेश नव्हता, कारण या देणग्यांचा कोणताही ठोस पुरावा आढळला नाही, असे तपासात उघड झाले. बँक स्टेटमेंट आणि भाविकांच्या संख्येच्या आधारे देणगीमध्ये लक्षणीय चढ-उतार दिसून आल्याचे अहवालात नमूद केले आहे. काही ठराविक महिन्यांमध्ये भाविकांची संख्या वाढली असूनही देणगी कमी जमा झाल्याचे दिसून आले आहे. सदर महिन्यांमध्ये नाण्यांपेक्षा नोटा कमी अर्पण केल्या गेल्या, असे चौकशीदरम्यान एसआयटीला सांगण्यात आले.
पाच वर्षांत कर्मचाऱ्यांची संपत्ती कशी वाढली?
गेल्या पाच वर्षांत अनेक कर्मचाऱ्यांची संपत्ती आणि उत्पन्न झपाट्याने वाढल्याचे तपासात आढळून आले आहे. एसआयटीने आपल्या तपासादरम्यान 60 हून अधिक लोकांची चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेजचा हवाला देत, एसआयटीने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. किती देणग्या मिळाल्या आणि त्या कोणत्या स्रोतातून आल्या, याचा कोणताही ठोस पुरावा सापडला नाही. त्यामुळे, प्रत्येक भक्ताच्या देणग्यांचा हिशोब न सापडल्याने, देणग्या चोरल्या गेल्या की नाही किंवा किती चोरल्या गेल्या, हे पुराव्यासह सिद्ध करणे तूर्तास तरी असफल आहे, असे एसआयटीने सांगितले. आता एका आठवड्याच्या आत प्राथमिक तपास अहवाल आणि 15 दिवसांच्या आत संपूर्ण अहवाल सादर केला जाईल, असे एसआयटीने सांगितले आहे.
Comments are closed.