देशात 17 वर्षांत 1,765 हत्तींचा अकाली मृत्यू झाला

ओडिशामध्ये सर्वाधिक : कर्नाटकातही 223 हत्तींचा बळी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील हत्तींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या 17 वर्षांत भारतात तब्बल 1 हजार 765 हत्तींचा अनैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून (आरटीआय) समोर आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हत्तींच्या मृत्यूचे सर्वांत मोठे कारण विजेचा धक्का असून त्यानंतर रेल्वे अपघात, अवैध शिकार आणि विषप्रयोग यांचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे या मृत्यूंच्या आकडेवारीत ओडिशा राज्य पहिल्या क्रमांकावर असून कर्नाटकातही मोठ्या प्रमाणात हत्तींचे बळी गेले आहेत.

2009 ते 2026 या कालावधीत विजेचा धक्का लागून देशातील तब्बल 1 हजार 185 हत्तींचा मृत्यू झाला आहे. एकूण अनैसर्गिक मृत्यूंपैकी हे प्रमाण 67 टक्क्मयांहून अधिक आहे. विशेष म्हणजे अवैध शिकारीत मारल्या गेलेल्या 222 हत्तींच्या तुलनेत विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या हत्तींची संख्या पाचपटांपेक्षा अधिक आहे. याच काळात रेल्वेच्या धडकेत 277 हत्तींचा, तर विषप्रयोगामुळे 81 हत्तींचा मृत्यू झाला आहे.

राज्यनिहाय आकडेवारीनुसार, हत्तींच्या सर्वाधिक अनैसर्गिक मृत्यूंची नोंद ओडिशामध्ये झाली आहे. येथे 371 हत्तींचा मृत्यू झाला. त्यानंतर आसाममध्ये 356, तर कर्नाटकात 223 हत्तींचा बळी गेला आहे. त्यामुळे देशातील हत्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कर्नाटकातील परिस्थितीही चिंताजनक असल्याचे स्पष्ट होते. विजेच्या धक्क्याने होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीतही ओडिशा पहिल्या क्रमांकावर आहे. ओडिशात 238, कर्नाटकात 195, तर आसाममध्ये 191 हत्तींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

रेल्वे अपघातांत आसाममध्ये सर्वाधिक बळी

रेल्वे मार्गांवर होणाऱ्या अपघातांचाही हत्तींच्या मृत्यूमध्ये मोठा वाटा आहे. आसाममध्ये रेल्वेच्या धडकेत सर्वाधिक 90 हत्तींचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये 68, तर ओडिशामध्ये 45 हत्ती रेल्वे अपघातांचे बळी ठरले आहेत. जंगलातून जाणारे रेल्वेमार्ग, वेगवान रेल्वे आणि हत्तींच्या स्थलांतराच्या मार्गांवरील अडथळे यामुळे हा धोका वाढत आहे.

शेतकऱ्यांच्या अवैध विद्युत कुंपणाचा जीवघेणा परिणाम

पर्यावरणतज्ञ अमित गुप्ता यांच्या मते, हत्तींच्या विजेच्या धक्क्याने होणाऱ्या मृत्यूंकडे केवळ अपघात म्हणून पाहता येणार नाही. हत्तींच्या मार्गांवर लावले जाणारे अवैध विद्युत कुंपण, जमिनीवर सोडलेल्या विजेच्या तारा आणि योग्य इन्सुलेशन नसलेल्या वीजवाहिन्या यामुळे हत्तींचे जीव जात आहेत. हत्तींकडून शेतीचे नुकसान होऊ नये, यासाठी काही शेतकरी रानडुक्कर आणि इतर वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी बेकायदेशीरपणे विद्युत तारा लावतात. मात्र, या तारांच्या संपर्कात आल्याने हत्तींचा मृत्यू होतो. अशा प्रकारच्या निष्काळजीपणावर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे पर्यावरणतज्ञांचे मत आहे.

मानव-हत्ती संघर्ष रोखण्याचे मोठे आव्हान

हत्तींच्या अधिवासात होणारे बदल, जंगलांमधील मार्गावर वाढणारे अतिक्रमण, शेतीचा विस्तार आणि मानवी वस्तीचा वाढता हस्तक्षेप यामुळे मानव-हत्ती संघर्ष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी हत्तींच्या पारंपरिक भ्रमणमार्गांचे संरक्षण करणे, धोकादायक वीजवाहिन्यांचे इन्सुलेशन करणे, अवैध विद्युत कुंपणांवर कारवाई करणे आणि रेल्वेमार्गांवर सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Comments are closed.