डीसी विरुद्धच्या अभिषेकच्या 135* धावा ठरल्या ऐतिहासिक! क्रिस गेल आणि ऍरॉन फिंचचा मोडला वर्ल्ड रेकॉर्ड

आयपीएल २०२६ मध्ये मंगळवारी (२२ एप्रिल) सनरायझर्स हैद्राबाद आणि दिल्ली कॅपिटल्स समोरा-समोर आले. हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात एसआरएचने त्यांची विजयी मालिका सुरूच ठेवली आहे. यामध्ये त्यांचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने नाबाद शतकी खेळी केली. त्याच्या जबरदस्त खेळीमुळे एसआरएचने २० षटकात २ विकेट्स गमावत २४२ धावसंख्या उभारली.

अभिषेकने डीसीविरुद्ध ६८ चेंडूत १० चौकार आणि १० षटकारांच्या सहाय्याने नाबाद १३५ धावा केल्या. ही त्याची टी२० क्रिकेटमधील चौथी १३० धावांपेक्षा अधिक वैयक्तिक धावसंख्या ठरली. त्याने ही कामगिरी करताच क्रिस गेल आणि ऍरॉन फिंच यांच्या विश्वविक्रमाला मागे टाकले आहे. या दोन्ही दिग्गजांनी टी२० क्रिकेटमध्ये १३० धावांपेक्षा अधिक वैयक्तिक धावसंख्या प्रत्येकी तीन-तीन वेळा केली आहे, मात्र अभिषेकने त्याच्या १८८ व्या टी२० सामन्यांतच त्यांचा हा विक्रम मोडला आहे.

टी२० क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा १३०+ धावा करणारे खेळाडू –
४ – अभिषेक शर्मा*
३ – ऍरॉन फिंच आणि क्रिस गेल

अभिषेकने २०२१ च्या सुरूवातीला पहिले टी२० शतक झळकावले होते. त्यानंतर २०२२ मध्ये त्याने एकदाही १०० धावांचा टप्पा ओलांडला नाही. २०२५ वर्ष त्याच्यासाठी खूप खास ठरले. त्याने या वर्षामध्ये तीन शतके केली. त्याची ही शेवटची चारही शतके १३० पेक्षा अधिक धावांची आहेत. त्याने आतापर्यंत ९ टी२० शतके केली आहेत. यामुळे त्याने विराट कोहली, क्विंटन डी कॉक, रायली रुसो आणि साहिबजादा फरहान यांची बरोबरी केली आहे.

अभिषेक शर्माच्या टी२० क्रिकेटमधील सर्वोच्च खेळी –
१३५ – इंग्लंडविरुद्ध, फेब्रुवारी २०२५
१४१ – पंजाब किंग्जविरुद्ध, एप्रिल २०२५
१४८ – बंगालविरुद्ध, नोव्हेंबर २०२५
१३५* – दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध, एप्रिल २०२६

सामन्यात एसआरएचने दिलेल्या २४३ धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डीसी २० षटकात ९ विकेट्स गमावत केवळ १९५ धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला. यामुळे हा सामना एसआरएचने ४७ धावांनी जिंकला. सध्या त्यांचे नेतृत्व ईशान किशन करत असून नियमित कर्णधार पॅट कमिन्स परतला आहे.

Comments are closed.