SRH vs DC: अक्षर पटेलचा खुलासा; त्या एका क्षणानं बदलला सामना, नाहीतर आम्ही…

आयपीएल 2026 मधील 31व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 47 धावांनी पराभव केला. या सामन्यात अभिषेक शर्माने अफलातून फलंदाजी करत 68 चेंडूत नाबाद 135 धावा ठोकल्या आणि हैदराबादच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर गोलंदाजांनीही शिस्तबद्ध मारा करत दिल्लीच्या फलंदाजांना आवर घातला.

सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने अभिषेक शर्माच्या खेळीबाबत प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “अभिषेकचा रन-आउटचा चान्स आणि त्याचा सोडलेला कॅच आम्ही पकडला असता, तर परिस्थिती वेगळी असू शकली असती. आम्ही त्याला सुरुवातीलाच बाद केलं असतं, तर धावांचा डोंगर उभा राहिला नसता.” मात्र, त्याचवेळी त्याने अभिषेकच्या उत्कृष्ट खेळीचे कौतुकही केले. “जेव्हा एखादा फलंदाज इतक्या दर्जेदार पद्धतीने खेळतो, तेव्हा त्याला श्रेय द्यायलाच हवं,” असे तो म्हणाला.

अक्षरने हेनरिक क्लासेनच्याही फलंदाजीचा उल्लेख करत सांगितले की, दुसऱ्या बाजूने मिळालेल्या साथीतूनच मोठी भागीदारी उभी राहिली. “अशा परिस्थितीत गोलंदाजांची चूक म्हणता येत नाही. कधी कधी फलंदाज इतका प्रभावी खेळतो की, कर्णधार किंवा कोच काहीच करू शकत नाही,” असेही त्याने स्पष्ट केले.हाय-स्कोअरिंग सामन्यांमध्ये गोलंदाजांना पाठिंबा देणे किती महत्त्वाचे आहे, यावरही अक्षरने भर दिला. “जर गोलंदाजाने चांगला चेंडू टाकला आणि तरीही फलंदाजाने उत्कृष्ट फटका मारला, तर त्यात काही करता येत नाही. मात्र, फिल्डिंग तुमच्या हातात असते. कॅच पकडणे आणि रन-आउट करणे हे महत्त्वाचे असते. तिथेच आम्ही कमी पडलो,” अशी कबुली त्याने दिली.

पुढील सामन्यांबाबत बोलताना अक्षर म्हणाला की, संघ सध्या कोणत्याही मोठ्या बदलाचा विचार करत नाही. “आम्ही चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी करत आहोत. अशा सपाट विकेटवर कधी कधी असा ‘ऑफ डे’ येतो. तो विसरून पुढे जाणे गरजेचे आहे,” असे म्हणत त्याने सकारात्मक दृष्टीकोन व्यक्त केला.

Comments are closed.