शिवशक्तीच शक्तिशाली; आमदार चषक कबड्डी स्पर्धेत महिला जेतेपदावर शिक्कामोर्तब, राजमाता जिजाऊची निकिता पडवळ सर्वोत्तम खेळाडू

शेवटच्या चढाईपर्यंत श्वास राखायला लावणार्‍या क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांच्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या महिला गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या शिवशक्ती महिला संघाने पुण्याच्या राजमाता जिजाऊविरुद्ध संघर्ष ३२-३० असा जिंकला आणि महिला कबड्डीत आपणच शक्तिशाली असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. मात्र आजचा दिवस गाजवला तो निकिता पडवळच्या वेगवान-कल्पक चढायांनी. ती राजमाता जिजाऊच्या गळ्यात जेतेपदाची माळ घालण्यात थोडक्यात अपयशी ठरली असली तरी ती सर्वोत्तम खेळाडूच्या स्कुटरवर विराजमान झाली.

विक्रोळी पूर्वेला टागोर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरु असलेल्या कबड्डी महोत्सवाच्या राज्यस्तरीय महिला गटाच्या अंतिम सामन्यात थराराने पुन्हा एकदा वातावरण पेटवले. उपांत्य सामन्यात शिवशक्तीच्या महिलांनी धर्मवीर कबड्डी संघाला तर राजमाता जिजाऊने डॉ. पतंगराव कदम संघावर सहज मात करत अंतिम फेरी गाठली. दोन्ही उपांत्य लढती एकतर्फी झाल्यामुळे हजारोंच्या संख्येने गर्दी करणार्‍या दर्दी कबड्डीप्रेमींची काहीशी निराशा झाली होती, पण अंतिम सामन्यातील संघर्षाने त्याची सव्याज भरपाई केली. शिवशक्ती आणि राजमाता जिजाऊ यांच्यातील सामना मुंबई विरुद्ध पुणे असा असला तरी कबड्डीप्रेमींनी दोन्ही संघांच्या खेळाला भरभरून दाद दिली. पहिल्या मिनीटापासूनच प्रत्येक गुणासाठी दोघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाल्यामुळे जो शेवटपर्यंत लढणार तोच जिंकणार, याचे संकेत मिळाले.

राज्याच्या महिला कबड्डीत कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या शिवशक्ती आणि राजमाता जिजाऊ संघांनी आपापल्या पहिल्या चढाईतच एकेक गुण मिळवत जोरदार सुरुवात केली. पुढे शिवशक्तीने चांगल्या पकडी करत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला तर राजमाता जिजाऊच्या निकीताने त्या आघाडीशी बरोबरी साधणारा खेळ करुन सामन्यात रंगत आणली. पहिल्या डावात केवळ दोन खेळाडू मैदानात असलेल्या शिवशक्तीवर लोण चढवण्याची नामी संधी राजमाता जिजाऊला होती, निकीताच्या सुसाट खेळानेच त्यांना ही संधी मिळवून दिली. पण तेव्हाच शुभदा खोत आणि अपेक्षा टाकळे यांनी मगरमिठीसारखी निकीताची पकड करत आपल्यावर पडणार्‍या लोणला वाचवले. यामुळे शिवशक्तीने मध्यंतराला १४-११ अशी आघाडी मिळवली.

मध्यंतरानंतर दोन्ही संघांमध्ये आघाडीसाठीचा संघर्ष आणखी तीव्र झाला. पण शिवशक्तीने शुभदा आणि रियाच्या चढायांमुळे आपली आघाडी २१-१२ अशी वाढवत सामन्यावर वर्चस्व मिळवले होते, पण तेव्हाही निकिताच्या आक्रमक चढायांनी राजमाता जिजाऊला पुन्हा सामन्यात आणण्याची किमया करून दाखवली. त्यानंतर सामन्यातील थरार शेवटपर्यंत कायम राहिला. शेवटची दोन मिनीटे असताना शिवशक्तीवर पडलेल्या लोणने स्कोर २९-२८ वर आणला होता. विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडू शकत होती. पण झटापटीच्या त्याक्षणी शिवशक्तीने आपली आघाडी ३२-३० अशी नेत अवघ्या दोन गुणांच्या फरकाने जेतेपदाला गवसणी घातली.

महिला विजेत्यांच्या पुरस्कारात वाढ

आमदार सुनील राऊत यांनी महिला गटातील विजेत्यांना दिली जाणारी रोख रक्कम एक लाखावरून दीड लाख रुपयांपर्यत वाढवल्यामुळे अंतिम लढतीत हा पुरस्कार जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी आपला सर्वोत्तम खेळ केला. विजेत्या शिवशक्तीला दीड लाख आणि आमदार चषकाने गौरविण्यात आले. राजमाता जिजाऊ पाऊण लाखांची मानकरी ठरली. मात्र त्यांच्या निकीता पडवळने स्कुटर जिंकली.सर्वोत्कृष्ट पकडपटूचा मानही त्यांच्याच ऋतुजा निगडेला मिळाला. शिवशक्तीची रिया मडकईकर सर्वोत्तम चढाईपटू ठरली. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजक आमदार सुनील राऊत यांच्यासह माजी आमदार रमेश कोरगावकर, महिला विभागप्रमुख रश्मी पहुडकर, नगरसेवक दीपक सावंत, विश्वास शिंदे, म्युनिसिपल कामगार सेनेचे बाबा कदम, मुंबई उपनगर संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर,कार्याध्यक्ष सुधाकर घाग, सचिव राजेश पडेलकर, उपाध्यक्ष सदानंद माजलकर, संयुक्त सचिव राजेंद्र अनभवणे यांच्या उपस्थितीत पार पडला.

बीपीसीएल-आयएसपीलमध्येच अंतिम लढत

तीन दिवसांपूर्वी प्रभादेवीत ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेत जो अंतिम थरार अनुभवयाला मिळाला तोच थरार विक्रोळीतही पाहायला मिळणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बीपीसीएलने आकाश पिकलमुंडे आणि मिलन दहिया यांच्या आक्रमक चढायांच्या बळावर मुंबई बंदरचा ३५-२२ असा सहज पराभव केला तर आयएसपीएलने ठाणे महानगरपालिकेचे आव्हान ४७-३२ असे मोडीत काढले. नीरज मिसाळ आणि अभिषेक गुंगे यांच्या तुफानी चढायांना रोखण्यात ठाणे पालिकेच्या खेळाडूंना अपयश आल्यामुळे मध्यंतरालाच २८-१४ अशा आघाडीसह आयएसपीएलने आपली अंतिम फेरी निश्चित केली होती. आता जेतेपदासाठी पुन्हा एकदा बीपीसीएल आणि आयएसपीएल एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्यामुळे बीपीसीएल पुन्हा विजेता होतो की आयएसपीएल आपल्या पराभवाचा वचपा काढतो याकडे कबड्डीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.