अमेरिका- इराणमध्ये हिंदुस्थान मध्यस्थी करणार का? राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया

आखाती देशातील युद्धाबाबत सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची मुदत वाढवली असली तरी ये युद्ध थांबणार का आणि आखाती देशात कायमस्वरुपी शांतता निर्माण होणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चेची दुसरी फेरी होणार असल्याची शक्यता आहे. या दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी अनेक देश मध्यस्थी करत आहेत. याबाबत हिंदुस्थानची नेमकी भूमिका काय, या देशांत हिंदुस्थान मध्यस्थी करणार काय, याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती दिली आहे.

पश्चिम आशियातील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानच्या भूमिकेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती दिली आहे. जर्मनीमध्ये असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, हिंदुस्थान सध्याच्या परिस्थितीत थेट मध्यस्थी करत नाही, परंतु भविष्यात अशी भूमिका बजावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राजनाथ सिंह म्हणाले, हिंदुस्थानने शांततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. पंतप्रधानांनी दोन्ही बाजूंना युद्ध संपवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. कदाचित भविष्यात अशी वेळ येईल, जेव्हा हिंदुस्थान महत्त्वाची भूमिका बजावेल आणि त्यात यशस्वी होऊ शकेल, असे राजनाथ सिंह म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी जर्मनी दौऱ्यावर असताना सांगितले की, हिंदुस्थानने शांततेसाठी प्रयत्न केले आहेत आणि भविष्यात इराण व अमेरिका यांच्यात मध्यस्थी करण्याची भूमिका बजावू शकतो. योग्य वेळ आल्यावर हिंदुस्थान पुढे येऊ शकतो, असे ते म्हणाले.

राजनाथ सिंह यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटींचे प्रयत्न विशेष यशस्वी झालेले नाहीत. त्यामुळे, आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की, एखादा तिसरा देश हस्तक्षेप करून परिस्थिती हाताळू शकतो का.

राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, राजनैतिक बाबींबाबत हिंदुस्थानचा दृष्टिकोन संतुलित राहिला आहे. हिंदुस्थानला युद्ध संपवून शांतता प्रस्थापित करायची आहे. यापूर्वी, राजनाथ सिंह यांनी जर्मनीतील आपल्या भाषणात म्हटले होते की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थितीचे हिंदुस्थानवर थेट परिणाम होतील. आपल्या ऊर्जेची मोठी गरज आखाती देशातून भागवली जाते, त्यामुळे तेथील कोणतेही संकट आपल्यासाठी महत्त्वाचे ठरते. आजच्या काळात कोणतेही प्रादेशिक संकट केवळ एका प्रदेशापुरते मर्यादित नाही. ऊर्जा सुरक्षा असो, अन्न सुरक्षा असो किंवा आर्थिक स्थिरता असो, त्याचे परिणाम जगभर जाणवतात, असे ते म्हणाले.

Comments are closed.