दिल्लीत 24 धोकादायक इमारती पाडल्या
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सत्य निकेतन ही इमारत कोसळून 7 जणांचा मृत्यू ओढवल्याचा प्रकरणावरुन धडा घेऊन दिल्ली महानगरपालिकेने शहरातील धोकादायक इमारतींच्या विरोधात आघाडी उघडली आहे. मंगळवारी एका दिवसात महानगरपालिकेने 24 इमारती धाराशायी केल्या आहेत. तर सात इमारतींना सील ठोकले आहे. 3 हजार अन्य इमारतींच्या स्थितीची पाहणी करण्यात येणार आहे. ज्या इमारती राहण्यासाठी योग्य नाहीत, त्यांच्या मालकांना नोटीसा दिल्या जाणार असून या इमारती पाडण्याची सज्जता दिल्ली महानगरपालिका प्रशासनाने केली आहे. सोमवारीही 7 इमारती पाडण्यात आल्या होत्या. ज्या इमारतींचे बांधकाम बेकायदेशीर आहे. त्यांच्या मालकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत दिल्ली सरकारने दिले आहेत.
दिल्लीच्या सर्व 12 विभागांमध्ये जोरदार कारवाई केली जात आहे. प्रत्येक भागातील अधिकारी त्यांच्या कार्यकक्षेतील इमारतीच्या स्थितीची पाहणी करणार आहेत. तसेच ज्या इमारतींची तातडीची दुरुस्ती आवश्यक आहे, ती त्यांच्या मालकांकडून त्वरित करुन घेतली जाणार आहे. मालकांनी आदेशांचे पालन न केल्यास त्यांच्यावर गुन्हे सादर केले जाईल, अशी शक्यताही व्यक्त केली जाते.
उपराज्यपाल-मुख्यमंत्र्यांची बैठक
दिल्लीचे उपराज्यपाल तरणजीतसिंग संधू आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या संबंधात मंगळवारी चर्चा केली. या बैठकीत दिल्ली महानगरपालिकेच्या उच्च अधिकाऱ्यांनीही भाग घेतला. दिल्लीतील प्रत्येक इमारतीचे कन्स्ट्रक्शन ऑडिट करण्याची प्रशासनाची योजना आहे. या योजनेवर काम करण्यात येत आहे. 1 जून 2026 ते 8 सप्टेंबर 2026 या कालावधीत दिल्ली महानगर पालिकेने 1 हजार 7 धोकादायक इमारती पाडल्या आहेत. तसेच आणखी 2 हजारांहून अधिक इमारतींच्या मालकांना नोटीस देण्यात आली आहे. या कालावधीत 471 इमारती सील करण्यात आल्या असून त्या राहण्यासाठी योग्य नसल्याचे घोषित करण्यात आले आहे. सत्य निकेतन इमारतीच्या दुर्घटनेअगोदरपासूनच दिल्ली महानगर पालिकेने धोकादायक इमारतींच्या विरोधात कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठ दिवसांमध्ये महानगरपालिकेने 48 इमारती पाडल्या असून 15 इमारतींना सील ठोकले आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे. सत्य निकेतन च्या घटनेनंतर आता धोकादायक इमारतींच्या विरोधातील कारवाई अधिकच तीव्र केली जाणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सर्व अधिकाऱ्यांना इशारा दिला असून कामचुकार अधिकाऱ्यांविरोधातही कारवाई करण्यासाठी सज्जता केली आहे.
Comments are closed.