काँग्रेसच्या काळात सर्रासपणे लालफितीचा प्रचार.

पंतप्रधान मोदी यांचा घणाघात, तरुणाईला संबोधन

► वृत्तसंस्था/ वडोदरा (गुजरात)

देशात आणि विविध राज्यांमध्ये काँग्रेस प्रणित प्रशासने सत्तेवर होती, तेव्हा लालफीतशाहीचा कहर होता, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते गुजरातमधील वडोदरा येथे युवक आणि मान्यवरांच्या एका कार्यक्रमात भाषण करत होते. वर्षानुवर्षे महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्यांच्या फायली, कोणताही निर्णय न होता, या टेबलावरुन त्या टेबलावर नुसत्या फिरत असत. भारताच्या अनेक महत्वाची दशके या दप्तरदिरंगाईत वाया गेल्याने विकासाचा वेग प्रचंड प्रमाणात मंदावला. 2014 पासून परिस्थितीत मोठी सुधारणा झाली असून देशहिताचे अनेक प्रकल्प वेगाने मार्गी लागले आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

गेल्या 12 वर्षांमध्ये देशात किती सुधारणा झाल्या, याची माहिती त्यांनी उपस्थितांना आकडेवारीसह दिली. गेल्या दशकभराच्या काळात आम्ही रेल्वे, महामार्ग, बंदरे, विमानतळ, देशांतर्गत जलमार्ग आदी सुविधांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. दूरसंचार, शिक्षण आणि आरोग्य सेवांचा प्रचंड विस्तार केला आहे. संरक्षण क्षेत्रात मोठी प्रगती केली असून संरक्षण साधनांची निर्यात काँग्रेसच्या काळाच्या तुलनेत 20 पटींहून अधिक वाढली आहे. या प्रगतीचे प्रत्यंतर आज देशाच्या विकासदरातून आपल्याला दिसून येते. तथापि, काही नकारात्मक मनोवृत्तीच्या नेत्यांना ही प्रगती खुपते. त्यामुळे ते नेहमीच तक्रारीचा रडवा सूर लावतात. त्यांच्याकडे सुजाण जनता लक्ष देत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

त्यांचेच सरकार असते, तर…

गेली बारा वर्षे देशात वेगाने काम करणारे सरकार आहे. त्यामुळे प्रकल्प धडाक्याने पूर्ण केले जात आहेत. आत्ता जर काँग्रेसचेच सरकार असते. तर कदाचित आजच्या तरुण पिढीनंतरच्या तीन चार पिढ्यांमध्येही हे प्रकल्प पूर्ण झाले नसते, असे त्या काळच्या कार्यपद्धतीवरुन दिसून येते. वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी या क्षेत्रात आम्ही आतापर्यंत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. संपूर्ण नोकरशाही आता उत्साहाने कामाला लागली आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

आकडेवारी केली सादर

वाहतुकीचा वेग किती वाढला आहे, याची आकडेवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केली. महामार्गांवरुन ज्या अंतराच्या प्रवासासाठी पूर्वी ट्रकला 30 तास लागत असत, ते आता 10 ते 12 तासांवर आले आहे. मालगाडीला ज्या अंतरासाठी साडेसहा ते सात तास लागत असत, त्या अंतराला आता त्याच्या निम्मा वेळ लागतो. जो माल गुजरातमधून मुंबईला आणण्यासाठी पूर्वी 250 ते 300 ट्रक्स लागत असत, तो आता एका मोठ्या डबल स्टॅक मालगाडीतून एकाच वेळी आणता येतो. ही प्रगती अवघ्या 10 वर्षांमध्ये झाली आहे, या बाबीचा सर्वांनीच विचार करावयास हवा आहे, ही बाब त्यांनी प्रकर्षात भाषणात मांडली.

आमच्या काळात गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही 50 हजार रेल्वेचे प्रवासी कोचेस (डबे) निर्माण करुन दाखविले आहेत. त्यापूर्वीच्या काँग्रेस सरकारांच्या काळात देशभरात 50 हजार संडासदेखील बांधले गेले नाहीत. प्रत्येक क्षेत्रात आमचा प्रकल्पपूर्तीचा वेग काँग्रेसच्या काळापेक्षा कित्येक पट अधिक आहे. तरुणाईनेही ही बाब समजून घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भाषणात केले.

एआयसाठी विशेष पुढाकार

कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या (एआय) क्रांतीचा लाभ भारतालाही व्हावा, यासाठी केंद्र सरकार मोठा पुढाकार घेत आहे. आमच्या तरुण पिढीने या तंत्रज्ञानासाठी सज्ज रहावे, अशी आमची इच्छा असून त्यासाठी मोठ्या योजना सज्ज आहेत. तरुणांनी एआय कौशल्य आत्मसात करावे, अशी सूचना त्यांनी केली.

35 हजार कोटींच्या योजनांचे उदघाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वडोदरा येथे गुजरातसाठीच्या 35 हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची उद्घाटने मंगळवारी करण्यात आली. यामध्ये 2 हजार 800 किलोमीटर लांबीच्या मालवाहतूक रेल्वे कॉरीडॉरचाही समावेश आहे. हा कॉरीडॉर ही आशियातील क्रांती आहे, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. या कॉरीडॉरची योजना 2004 मधील आहे. तथापि, त्याची एक इंचही निर्मिती काँग्रेसच्या काळात झाली नाही. 2014 मध्ये आमचे सरकार आले तेव्हा त्याला वेग प्राप्त झाला आणि आज तो पूर्णत्वास जात आहे. हा आमच्या आणि त्यांच्या सरकारांमधील फरक आहे, असे प्रतिपादन त्यांनी या उद्घाटनानंतर केले आहे.

तरुणाईवरच लक्ष केंद्रीत…

ड तरुणाईच्या हाती देशाचे भवितव्य, तिचे स्वप्ने साकारणे हे आमचे ध्येय

ड आमच्या सरकारच्या काळात प्रकल्पपूर्तीचा विक्रमी वेग, दिरंगाईला निरोप

ड काँग्रेसच्या काळातील दप्तर दिरंगाईमुळे देशाची अनेक दशके गेली वाया

ड एआय क्रांतीसाठी भारत सज्ज, अनेक योजना, परिणाम लवकरच समोर

Comments are closed.