पुण्यातील शिरूरमध्ये 250 किलो गांजा पकडला; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत पुण्यातील शिरूरमध्ये तब्बल 250 किलो गांजा जप्त केला. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक दोनने केलेल्या या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली असून, गांजा, आलिशान मोटार आणि मोबाईल फोन असा एकूण 1 कोटी 51 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

समीर पुरुषोत्तम राऊत (वय 24) आणि अजय जगदीश मोहिते (वय 30, दोघेही रा. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शिरूर तालुक्यातील दत्त मंदिराजवळील स्टेट बँक कॉलनीतील सत्यभामा निवास इमारतीसमोरील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून 250 किलो गांजा जप्त केला. त्याची किंमत एक कोटी 25 लाख रुपये आहे. तसेच 25 लाख रुपये किमतीची महिंद्रा एक्सयूव्ही 700 आणि सॅमसंग व ओप्पो कंपनीचे दोन मोबाईल फोन (किंमत एक लाख 20 हजार रुपये) जप्त केले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत एक कोटी 51 लाख 20 हजार रुपये आहे.

गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, नितीनकुमार नाईक, अंमलदार योगेश कुंभार, शरद धांडे, सतीश चव्हाण, प्रशांत कळसकर, योगेश मांढरे, सुहास धायगुडे, अख्तर शेख, जानवी सूर्यवंशी, सुरेखा साबळे, सुकेशनी आंबले, अजिंक्य जोजारे , दिनेश बास्टेवाड यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Comments are closed.