अहिल्यानगरात ऊसदराची कोंडी कायम, चार हजारांच्या मागणीवर शेतकरी ठाम; कारखानदारांसोबत उद्या बैठक

अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊसदराचीं कोंडी अद्यापि सुटलेली नाही. शेतकरी प्रतिटन 4000 रुपये दरावर ठाम असून, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची उद्या (दि. 26) होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक शुक्रवारी (दि. 27) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, श्रीगोंदा तालुक्यातील ‘ओंकार ग्रुप’ने हिरडगाव आणि देवदैठण येथील आपल्या दोन्ही कारखान्यांसाठी प्रतिटन 3700 रुपये ऊसदर जाहीर करून चर्चेला नवी दिशा दिली आहे. मात्र, शेतकरी संघटना चार हजार रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीवर ठाम आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 23) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना प्रतिटन 3700 रुपये पहिली उचल, त्यानंतर 100 रुपये आणि साखरेच्या दरातील तफावतीनुसार आणखी 200 रुपये, अशी एकूण चार हजार रुपयांची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील 4200 रुपयांच्या दराचा दाखलाही शेतकरी संघटनांकडून दिला जात आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी 3100 ते 3200 रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. यामध्ये थोरात व काळे कारखान्यांचा 3200 रुपये, तर घुले, अशोक, ढाकणे, मुळा आणि अगस्ती कारखान्यांचा 3100 रुपये दर आहे. मात्र, हा दर मान्य नसल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.

बैठकीसाठी कारखानदारांना बजावल्या नोटिसा

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कारखान्यांना प्रतिक्विंटल 4000 रुपये देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही कारखानदारांनी अंतिम ऊसदर जाहीर केलेला नाही. पालकमंत्र्यांनी यापूर्वी तीन बैठका घेऊन समन्वयाचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून तोडगा निघाला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी कारखान्यांच्या अध्यक्षांना बैठकीस उपस्थित राहण्यासाठी कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) गणेश पुरी यांनी काढलेल्या पत्रानुसार, 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता बैठक होणार असून, कारखान्यांच्या अध्यक्षांनी स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक आहे. अनुपस्थित राहणाऱ्या कारखान्यांविरुद्ध प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे या बैठकीत ऊसदराचा तिढा सुटणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.