पंढरपुरात वारकऱ्यांसाठी 2500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, आषाढीसाठी नगरपालिका सज्ज; मुख्याधिकारी रोकडे यांची माहिती
आषाढी शुद्ध एकादशीचा सोहळा शनिवारी (दि. 25) होणार असून, आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी 18 ते 20 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. भाविक आणि नागरिकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असून, 2500 कर्मचारी नेमण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
आषाढी यात्रा कालावधीत शहरासह नदीपात्र, वाळवंट, 65 एकर परिसर, पत्राशेड, प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर, वाखरी पालखीतळ आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी तसेच सुरळीत पाणीपुरवठा, विद्युतपुरवठा उपलब्ध राहण्यासाठी 2500 कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
प्रशासनामार्फत पाणीपुरवठय़ाच्या सर्व यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली आहे. आषाढी यात्रा कालावधीत महिलांच्या स्वच्छतेच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरामध्ये वेगळ्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच नदीपात्र, वाळवंट परिसर, वाखरी पालखीतळ, भक्तिसागर व विविध ठिकाणी 12 हिरकणी कक्ष स्थापन करण्यात येत असून, कक्षाच्या ठिकाणी
सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिन बसविण्यात येणार आहेत. भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी शहरातील बोअरवेलच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. दररोज 45 एमएलडी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असून, त्याची क्लोरीन टेस्ट केली जाणार आहे. तसेच वारी कालावधीत शहरात विविध ठिकाणी 50 टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. यात्राकाळात शहरातील व उपनगरांतील सर्व मैदाने, नदी परिसर, 65 एकर, पत्राशेड दर्शनबारी रोज स्वच्छ व निर्जंतुक करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रोकडे यांनी दिली.
धोकादायक इमारतींना नोटीस
सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असून, अतिधोकादायक वास्तू पाडल्या आहेत. शहरातील मुख्य रस्त्यावरील व वाळवंटातील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. वाहनतळावरती दिशादर्शक फलक लावण्यात आले असून, आवश्यक ठिकाणी बॅरेकेटिंग करण्यात येणार आहे.
प्लॅस्टिकचा वापर टाळा
यात्राकालावधीमध्ये येणाऱया भाविकांनी शौचालयाचा वापर करावा, सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर टाळावा तसेच आरोग्य-सुव्यवस्थित राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्षा प्रणिती भालके व उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांनी यावेळी केले आहे.
Comments are closed.