प्रेमाच्या आमिषाने १७ वर्षीय मुलीचे अपहरण; कोकणात डांबून अत्याचार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रेमाचे आमिष दाखवून लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला रत्नागिरी जिल्ह्यात आणत कोकणातील एका ठिकाणी डांबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उदगीर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तपासाची चक्रे वेगाने फिरवत पीडित मुलीची सुटका केली असून मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या एका सहआरोपीला अटक केली आहे.

उदगीर ग्रामीण पोलिस निरीक्षक गाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उदगीर तालुक्यातील लोणी येथील १७ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी संशयितांच्या मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून मुख्य आरोपीला मदत करणारा गणेश बसुराज फड याचा एक मित्र चिपळूणच्या ग्रामीण भागात राहत असल्याची माहिती समोर आली. या मित्राच्या घरातच पीडित मुलीला ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर उदगीर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकून मुलीची सुखरूप सुटका केली. पोलिस संरक्षणात आल्यानंतर पीडित मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर या प्रकरणात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गंभीर कलमांची भर घालण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी कृष्णा अच्युत फड (वय १८) या मुख्य आरोपीसह गणेश बसुराज फड (वय २०) या सहआरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावली असून चिपळूणमधील संबंधित स्थानिक मित्राच्या भूमिकेसह संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Comments are closed.