26/11 मुंबई अतिरेकी हल्ला; आरोपीला चालक परवाना मिळणार नाही, हायकोर्टाने फेटाळली याचिका
26/11 मुंबई अतिरेकी हल्ला प्रकरणात निर्दोष सुटका झालेला आरोपी फहीम अन्सारीने व्यावसायिक चालक परवान्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.
टॅक्सी व रिक्षा चालवण्यासाठी हा परवाना आवश्यक असतो. उदरनिर्वाहासाठी अन्सारीला हा परवाना हवा आहे. मात्र पोलिसांनी यासाठी लागणारी एनओसी दिली नाही. त्याविरोधात अन्सारीने याचिका दाखल केली. न्या. अजय गडकरी व न्या. रणजीतसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. सुरक्षेच्या कारणास्तव अन्सारीला पोलीस एनओसी देता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने ही याचिका फेटाळली.
पोलिसांचा दावा
लष्कर ए तोयबा या बंदी असलेल्या अतिरेकी संघटनेसाठी काम करत असल्याचा अन्सारीवर आरोप होता. मुंबई हल्ला खटल्यातून त्याची सुटका झाली असली तरी पोलीस एनओसी नाकारणारा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला. हा अहवाल गुप्त ठेवावा, अशी विनंती पोलिसांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली.
Comments are closed.