27 नवीन वंदे भारत ट्रेन लवकरच धावणार आहेत.
2,700 कोटी रुपयांचा होणार खर्च : सुपर ट्रेनवरही होतेय वेगाने काम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रेल्वे देशात प्रवासाची पद्धत पूर्णपणे बदलण्याच्या तयारीत आहे. प्रवाशांना जागतिक स्तराच्या सुविधा आणि वेगवान प्रवास देण्यासाठी चालू आर्थिक वर्षात 2,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चातून सुमारे 27 नव्या सेमी-हायस्पीड वंदे भारत रेल्वे तयार करणार आहे.
देशाच्या तिन्ही प्रमुख कोच कारखान्यांमध्ये या रेल्वेगाड्यांची निर्मिती युद्धस्तरावर सुरू आहे. सध्या देशभरात चेअरकार आणि स्लीपर मिळून 100 हून अधिक वंदे भारत रेल्वे धावत आहेत, तर चालू आर्थिक वर्ष वंदे भारत रेल्वे निर्मितीच्या दृष्टीकोनातून सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे.
स्लीपर अन् चेअरकारचे मिळतेजुळते स्वरुप
चालू आर्थिक वर्षात 27 रेल्वे संचांची निर्मिती पूर्ण होणार असून ज्यांची संख्या मागणीच्या आधारावर वाढू शकते. चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्ट्री, रायबरेली येथील मॉर्डन कोच फॅक्ट्री आणि कपूरथळा येथील रेल्वे कोच कारखान्यात या रेल्वेगाड्यांची निर्मिती जारी आहे.
1000 वंदे भारतची योजना
-भारतीय रेल्वेने दीर्घ कालावधीसाठी 1 हजार वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे निर्माण करण्याचे लक्ष्य बाळगले आहे.
-यात 8, 16 आणि 24 डबे असलेले वेगवेगळे ट्रेन सेट (चेअरकार अन् स्लीपर) सामील असतील.
– या महाप्रकल्पासाठी 35,000 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे.
– नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना लवकरच देशातील वेगवेगळ्या मार्गांवर सुरू केले जाणार आहे.
स्वदेशी बुलेट ट्रेनही लवकरच
वंदे भारत नंतर रेल्वे आता पुढील विचार करत आहे. आयसीएफ चेन्नई आणि बीईएमएल मिळून 280 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावणाऱ्या पूर्णपणे स्वदेशी हायस्पीड रेल्वेची निर्मिती करत आहेत. प्रारंभिक योजनेनुसार या स्वदेशी हायस्पीड रेल्वेला देशात निर्माण होणाऱ्या बुलेट ट्रेन (हायपर स्पीड) मार्गावर संचालित करण्यात येणार आहे. यामुळे भारत रेल्वेनिर्मिती क्षेत्रात पूर्णपणे आत्मनिर्भर होऊ शकणार आहे.
एलएचबी कोचशी तुलना
वंदे भारत रेल्वेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, डबे अन् स्वत: वेग पकडणारी इंजिन सिस्टीम असल्याने याचा खर्च सामान्य शताब्दी किंवा राजधानीच्या एलएचबी डब्यांपेक्षा अधिक आहे. एलएचबी ट्रेन सेटचा खर्च जवळपास 80 कोटी रुपये आहे, तर वंदे भारत ट्रेन सेटचा खर्च 100 कोटी रुपयांहून अधिक आहे. याचनुसार 27 नव्या वंदे भारत रेल्वेंचे एकूण बजेट सुमारे 2,700 कोटी रुपयांहून अधिक आहे.
Comments are closed.