2 दिवसात NEET च्या 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली
गुजरातच्या विद्यार्थ्याने इमारतीवरून घेतली उडी : तामिळनाडूच्या विद्यार्थिनीला पुनर्परीक्षेची भीती
वृत्तसंस्था/कोइम्बतूर
तामिळनाडूच्या कोइम्बतूरमध्ये नीटची तयारी करणारी 19 वर्षीय विद्यार्थिनी अनुकीर्तनाने विष प्राशन करत आत्महत्या केली आहे. तर मृत्यूपूर्वी विद्यार्थिनीने स्वत:चे काका आणि नातेवाईकांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठविले होते. मी नीट परीक्षा दिली होती आणि वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची प्रतीक्षा करत होते, परंतु परीक्षाच रद्द झाली, आता पुन्हा परीक्षा देण्याची भीती वाटतेय, माझ्या वडिलांनी माझ्याकरता खूप पैसे खर्च केले आहेत, मी त्यांना सामोरी कशी जाऊ हेच समजत नसल्याचे अनुकीर्तनाने मेसेजमध्ये नमूद केले होते.
तर अहमदाबादच्या न्यू रानीप भागात 17 वर्षीय विद्यार्थ्याने आनंदम फ्लॅट्सच्या ब्लॉक बीच्या 6 व्या मजल्यावरून उडी घेतली आहे. विद्यार्थी नीटची तयारी करत होता, त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मागील 2 दिवसांमध्ये नीट विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे हे चौथे प्रकरण आहे. यार्पी 16 जून रोजी देहरादूनची 23 वर्षीय रिया थापा आणि लखनौत 17 वर्षीय एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. 12 मे रोजी नीट परीक्षा रद्द झाल्यापासून देशभरात आतापर्यंत जवळपास 12 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.
कोइम्बतूरमधील घटना
अनुकीर्तना कोइम्बतूरच्या कोवईपुदुर येथील पार्क टाउनमध्ये राहत होती. तिचे पिता सेंथिल प्रभू हे कामगार युनियनचे जिल्हा सचिव आहेत. अनुकीर्तनाचे डॉक्टर होत गरीबांना मदत करण्याचे स्वप्न होते. परंतु पेपरलीक झाल्याने नीट रद्द होणे आणि 21 जून रोजी पुनर्परीक्षेच्या घोषणेमुळे तिला मोठा धक्का बसला होता. अनुकीर्तनाने स्वत:च्या नातेवाईकांना एक मोठा व्हॉट्सअॅप मेसेज पाठविला होता. हा मेसेज वाचल्यावर नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली होती. खोलीचा दरवाजा तोडल्यावर ती बेशुद्धावस्थेत आढळून आल्याने त्वरित एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले, जेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
विद्यार्थिनीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांनी तिचा मृतदेह स्वीकारण्यास प्रथम नकार दिला. नंतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यावर बुधवारी रात्री उशिरा मृतदेह स्वीकारण्यात आला. तर तिच्या परिवाराने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर माकपच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात निदर्शने केली आणि नीटवर बंदी घालण्याची मागणी केली. तर पोलिसांनी विद्यार्थिनीचा मोबाइल फोन जप्त करत याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे.
पेपरलीकमुळे रद्द
नीट-युजी परीक्षा 3 मे रोजी आयोजित करण्यात आली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थी या परीक्षेत सामील झाले होते. परीक्षेनंतर अनेक राज्यांमध्ये पेपरलीक आणि काही विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका मिळाल्याचे समोर आले. याप्रकरणी चौकशीत गुन्ह्याचे संकेत मिळाल्यावर एनटीएने 12 मे रोजी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घोषित केला होता. यानंतर केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांच्या समीक्षेच्या आधारावर पुनर्परीक्षा करविण्याचा निर्णय घेण्यात आला.
Comments are closed.