रायगडात आठ वर्षांत १ हजार ७३१ वणवे, साडेचार हजार हेक्टर जंगल खाक; वणव्याच्या वाढत्या घटनांनी वनसंपदा, पशुपक्षी धोक्यात
निसर्गाचे वरदान लाभलेल्या रायगड जिल्ह्यातील हिरवाई आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या आठ वर्षांत १ हजार ७३१ लागलेल्या वणव्यांमध्ये साडेचार हजार हेक्टर जमीन खाक झाल्याचे समोर आले आहे. या वणव्यांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या हानीबरोबरच जंगलातील प्राणी-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे मोठ्या प्रमाणात चारा भस्मसात झाल्याने पशुधनांचा प्रश्न गंभीर झाला आहे.
रायगड जिल्ह्याला सुमारे दीड लाख हेक्टर जंगल क्षेत्र लाभले असून गेल्या आठ वर्षांत ४ हजार ४२४ हेक्टर जमिनीवर वणवा लागला आहे. वणव्यांमुळे वनसंपदा धोक्यात येत आहे. जंगलात गवताळ कुरणे, दगडफूल, सोनकी प्रकार, कारवी जाती, पानफुटी, कळलागा झाडी, तेरडा, रेवतांबी, रानआळे, सोनजाई, रानकेळी, सापकांदा, टोपली कारवी, सर्पगंधा, अश्वगंधा यासारख्या वनस्पतींचा समावेश आहे. तर घुबड, चंडोल, रानकोंबड्या, मोर, सापांच्या प्रजाती, भेकरे यासारख्या पशुपक्ष्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. १८४ प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातीही अडचणीत सापडल्या असून वाढते वणवे रोखण्यात वनविभागाला अपयश आले आहे.
Comments are closed.