लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणात ७,५०० पानांचे आरोपपत्र
दहशतवादी नेटवर्क चालवल्याचा 10 जणांवर आरोप, 5 डॉक्टरांचा समावेश
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
राष्ट्रीय राजधानी दिल्लीला उद्ध्वस्त करणाऱ्या कार बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएने 7,500 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस येथील एनआयए विशेष न्यायालयात दाखल केलेल्या या आरोपपत्रात 10 आरोपींची नावे आहेत. 10 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक जण जखमी झाले. दिल्ली लाल किल्ला स्फोटातील सर्व आरोपी ‘सर गझवत-उल-हिंद’ आणि ‘अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट’ या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते. अटक केलेल्या 8 दहशतवाद्यांपैकी पाच जण व्यवसायाने डॉक्टर आहेत. आरोपपत्रात मुख्य आरोपी पुलवामा येथील रहिवासी डॉ. उमर उन नबी यांचेही नाव असून त्याचे आता निधन झाले आहे. तो हरियाणातील फरिदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत होता.
10 नोव्हेंबर 2025 ची घटना
10 नोव्हेंबर, 2025 च्या संध्याकाळी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात एक शक्तिशाली स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, जवळच पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फुटल्या. त्यात अनेक दुकाने आणि इमारतींचेही नुकसान झाले होते. हा साधा स्फोट नसून उच्च-तीव्रतेचा व्हीबीआयईडी हल्ला होता. या घटनेनंतर दिल्ली-एनसीआरमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला. देशभरातून अनेक सुरक्षा यंत्रणा आणि फॉरेन्सिक पथके घटनास्थळी दाखल झाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता नंतर तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला होता.
Comments are closed.