होर्मुझजवळ आणखी एक भारतीय जहाज बुडाले

ओमानच्या किनाऱ्याजवळ हल्ला : 14 कर्मचारी सुदैवाने बचावले

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, होर्मुझच्या सामुद्रधुनीत आणखी एक गुजराती मालवाहू जहाज बुडाले. ‘हाजी अली’ नावाचे हे जहाज 13 मे रोजी सकाळी ओमानच्या सागरी हद्दीतून जात असताना त्यावर ड्रोन किंवा क्षेपणास्त्रासारख्या शस्त्राने हल्ला झाला. या हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली.  बचावकार्यादरम्यान ओमानच्या तटरक्षक दलाने सर्व 14 कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. गुजरातमधील द्वारका येथील रहिवासी आणि जहाजाचे मालक सुलतान अहमद अन्सार यांनी गुरुवारी हल्ल्यासंबंधी माहिती दिली.

‘एमएसव्ही हाजी अली’ हे जहाज बेरबेरा बंदरातून शारजाकडे जात होते. पहाटे 3:30 च्या सुमारास ओमानच्या किनाऱ्याजवळ जहाजाला जलसमाधी मिळाली. कर्मचाऱ्यांनी जहाजावर स्फोटकासारखी वस्तू आदळल्याचा आवाज ऐकल्याचे सांगितले. त्यानंतर जहाजाला आग लागली. परिस्थिती अधिकच बिकट झाल्याने सर्व 14 कर्मचाऱ्यांनी लाईफबोटच्या साहाय्याने जहाज सोडले, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी 7 मे रोजी गुजरातच्या द्वारका येथून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणारे एमएसव्ही अल फैज नूरे सोलेमानी-1 हे आणखी एक मालवाहू जहाज देखील अमेरिका आणि इराणच्या नौदलांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या टप्प्यात आले होते.

दोन भारतीय एलपीजी कंटेनर सुरक्षितपणे मार्गस्थ

होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये तणावाचे वातावरण असतानाच दोन एलपीजी जहाजांनी सामुद्रधुनी पार करून भारताकडे कूच केले. भारतासाठी एलपीजी घेऊन जाणाऱ्या दोन जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्याचे बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव, मुकेश मंगल यांनी सांगितले. दोन्ही जहाजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या समन्वयाने कार्यरत होती. पहिले जहाज मार्शल आयलंड्सचा ध्वज असलेले एलपीजी वाहक असून ते अंदाजे 19,965 मेट्रिक टन एलपीजी घेऊन येत आहे. ते जहाज 13 मे रोजी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पार झाले असून 16 मे रोजी कांडला बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे. दुसरे जहाज, ‘एनव्ही सनशाईन’ हे व्हिएतनामी ध्वज असलेले एलपीजी वाहक जहाज असून ते अंदाजे 46,000 मेट्रिक टन एलपीजीसह येत आहे. ते जहाज 14 मे रोजी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पार झाले असून 18 मे रोजी न्यू मंगळूर बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे.

चिनी जहाजांना परवानगी

इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणी नौदलाने बुधवार रात्रीपासून चिनी जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे. या वृत्तानुसार, अनेक चिनी जहाजांच्या एका गटाने या सागरी मार्गातून सुरक्षितपणे प्रवास केला.

Comments are closed.