केरळचे नवे मुख्यमंत्री होणार व्हीडी सतीसन.
निकालाच्या दहा दिवसांनंतर पक्षाकडून उमेदवाराची घोषणा
वृत्तसंस्था/तिरुअनंतपुरम
राज्यात 4 मे रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दहा दिवसांनी गुरुवारी केरळममध्ये अखेर नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करण्यात आले. व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची घोषणा गुरुवारी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होताच समर्थकांनी सतीशन यांच्या निवासस्थानी गर्दी करून जल्लोष केला. सतीशन हे सहा वेळा आमदार राहिले असून राज्यात पक्षातील एक प्रमुख व्यक्तिमत्व मानले जातात. सतीशन यांच्या निवडीच्या निर्णयात के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या तीन नावांवरून पक्षात मोठी अंतर्गत कलह आणि लॉबिंग सुरू होती.
काँग्रेस नेत्या दीपा दासमुन्शी यांनी दिल्लीत सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. दिल्लीतील माहितीनंतर आता दासमुन्शी अजय माकन आणि मुकुल वासनिक यांच्यासोबत केरळमला जाऊन नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक करणार आहेत. आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी त्या तेथील सर्व आमदारांना भेटतील, असे त्यांनी सांगितले. पक्षाच्या हायकमांडच्या निर्णयाला सर्वांचा पाठिंबा असून सर्वजण एकजुटीने काम करतील, असेही त्यांनी सांगितले. अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत केरळमच्या सत्तेवर दहा वर्षांपासून असलेल्या डाव्या आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटने प्रचंड बहुमत मिळविले आहे.
काँग्रेसच स्वबळावर बहुमतासमीप पोहोचले आहे. परंतु हा विजय जितका स्पष्ट तितकेच त्यानंतरचे चित्र जटिल ठरले होते. सरकार स्थापन होण्यापूर्वीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून चढाओढ तीव्र झाली होती. केरळम काँग्रेसमध्ये उघड वक्तव्ये होत नसली तरीही आतून लॉबिंग पूर्ण जोरात सुरू होते. 9 एप्रिल रोजी मतदान झाल्यापासून प्रत्येक गटाने स्वत:च्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन सुरू केले होते. कुणी संभाव्य आमदारांची मोजणी करत होता, तर कुणी दिल्ली दरबारात स्वत:ची पकड मजबूत करत राहिला. या पूर्ण कवायतीत जातीय समीकरण, क्षेत्रीय संतुलन आणि संघटनात्मक पकड यासारखे घटकही महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी तब्बल दहा दिवसांचा अवधी लागला.
व्ही. डी. सतीशन यांचा तळागाळाशी संपर्क
मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून निवड झालेले व्ही. डी. सतीशन यांची स्थानिक पातळीवर पक्षात तुलनात्मकदृष्ट्या चमकदार कामगिरी आहे. त्यांचा तळागाळाशी चांगला संपर्क आहे. यापूर्वी विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी डाव्या सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका बजावत स्वत:ला प्रभावी चेहरा सिद्ध केले. त्यांच्याकडे ग्राउंड कनेक्शनसोबतच आमदारांचा एक वर्ग उभा आहे.
Comments are closed.