पिकअप वाहन ट्रकला धडकल्याने 8 मजूर ठार – वाचा
भिंड, 18 ऑगस्ट:
मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात मंगळवारी पहाटे त्यांच्या पिक-अप वाहनाची ट्रकला धडक बसल्याने आठ मजूर ठार आणि 32 जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले.
भिंड-ग्वाल्हेर राष्ट्रीय महामार्गावरील छिमका गावाजवळ पहाटे एकच्या सुमारास हा अपघात झाला.
ग्वाल्हेरमध्ये भात लावणीचे काम संपवून हे मजूर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील त्यांच्या गावी परतत होते.
महामार्गावर बसलेल्या गुरांना वाचवण्याच्या प्रयत्नात मजुरांच्या वाहनाच्या चालकाचे चाकावरील नियंत्रण सुटले, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे वाहन चुकीच्या दिशेने गेले आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपर ट्रकला धडकले, अशी माहिती गोहड चौराहा पोलिस ठाण्याचे प्रभारी रामनरेश यादव यांनी दिली.
धडकेमुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले आणि अनेक मजूर आत अडकले, असे त्यांनी सांगितले.
त्यात आठ मजूर ठार झाले. यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात 32 जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या कामगारांची सुटका केली.
सर्व जखमींना तातडीने गोहड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. गंभीर जखमींना उपचारासाठी ग्वाल्हेरला पाठवण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Comments are closed.